Ticker

6/Breaking/ticker-posts

आजच्या‘भारत बंद’ला जिल्हा काँग्रेसचा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पाठिंबा ! - बाळासाहेब साळुंके

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर: केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्याने देशभरातील शेतकरी व शेती उद्धवस्त होणार आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांना भांडवलदारांच्या दावणीला बांधत आहे. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आहेत. या महागाईने सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहेच परंतु नोकरदार व मध्यमवर्गीयांचेही कंबरडे मोडले आहे. या झोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज भारत बंदची हाक दिली असून या भारत बंदला जिल्हा काँग्रेस सक्रीय पाठिंबा असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांनी दिली.

 यासंदर्भात साळुंके पुढे म्हणाले की, शेतकरी बांधव व सर्वसामान्यांच्या हक्कासाठी बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी जिल्हा व तालुका मुख्यालयी बंद यशस्वी करण्यात येणार आहे. काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर मागील ११ महिन्यांपासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलन काळात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले आहेत. मोदी सरकारने सुरुवातीला चर्चेचा देखावा केला, पण तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी मात्र मान्य केली नाही. कृषी कायद्यातील बदलांमुळे रेशनिंग बंद होणार आहे. त्यामुळे गोरगरिब जनता कामगार वर्गावर उपासमारीची वेळ येणार आहे.

 मात्र मोदी सरकार या बाबींवर बोलायलाही तयार नाही. तर दुसरीकडे इंधनावर अव्वाच्या सव्वा कर लावून केंद्र सरकार दिवसाढवळ्या लोकांच्या खिशावर दरोडा टाकत आहे. पेट्रोल १०० रुपये लिटर तर गॅस सिलिंडर ९०० रुपयांवर गेला आहे. महागाईने लोकांचे जगणे कठीण झाले आहे. कामगार कायद्यांतील बदलांमुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत, देशातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बेरोजगार होत चालला आहे असे साळुंके म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांनी बंद यशस्वी करण्यासाठी पुढाकार घ्यावा व सर्व फ्रंटल विभाग, कार्यकर्ते यांनी कोरोणाचे नियम पाळून यशस्वीरित्या बंदला पाठिंबा द्यावा असे आवाहन जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या