Ticker

6/Breaking/ticker-posts

माहेरहून हुंडा आणला नाही म्हणून पतीने मोबाइलवरून मेसेज करत दिला तलाक ; बीड जिल्ह्यातील 5 जणांविरूद्ध गुन्हा

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगरः पती आणि सासरच्या मंडळींनी आधी हुंड्यासाठी छळ केला, नंतर घरातून हाकलून दिले आणि नंतर एसएमएस पाठवून थेट तलाकच देऊन टाकला. अशी घटना नगरमधील एका महिलेच्या वाट्याला आली. तिने पोलिसांत फिर्याद दिली असून त्यावरून तिच्या बीड जिल्ह्यातील सासरच्या पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नव्याने करण्यात आलेल्या मुस्लिम महिला विवाह संरक्षण अधिनियामातील कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहराजवळील भिंगार येथील महिलेचा खालीद ख्वाजा सय्यद (रा. रायमोह, ता. शिरूर कासार, जि. बीड) याच्याशी तीन वर्षांपूर्वी विवाह झाला. विवाहानंतर काही दिवसांतच नोकरीसाठी माहेरहून पैसे आणावेत, या कारणावरून तिचा छळ करण्यात येऊ लागला. मानसिक छळ आणि मारहाणही करण्यात आली. तिला उपाशीपोटीही ठेवले जात होते. एप्रिल २०१८ ते ऑगस्य २०१९ पर्यंत सातत्याने हा छळ सुरू होता. तरीही तिने पैसे आणले नाहीत. त्यामुळे सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर काढले. सततच्या छळाला कंटाळून तीही माहेरी निघून आली.


भिंगार येथील आई-वडिलांच्या घरी राहत असताना तिचा पती खालीद ख्वाजा सय्यद याने तिला मोबाईलवर एसएमएस पाठवून तिहेरी तलाक दिला. त्यामुळे विवाहितेने भिंगार पोलिस ठाण्यात धाव घेतली. तेथे तिने आतापर्यत झालेल्या घटनांची माहिती दिली. पोलिसांनी तिची फिर्याद नोंदवून घेतली. त्यानुसार पती खालीद ख्वाजा सय्यद, सासरा ख्वाजा मैनुद्दीन सय्यद, सासू परवीन ख्वाजा, सासूची आई, सुग्राबी जाफर सय्यद, दीर परवेज ख्वाजा (सर्व रा. रायमोह, ता. शिरूर कासार, जि. बीड) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड विधानातील कलमांसोबतच नव्याने करण्यात आलेल्या मुस्लिम महिला विवाह संरक्षण अधिनियामातील कलमेही आरोपींविरूद्ध लावण्यात आली आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी नगर पोलिसांचे पथक बीड जिल्ह्यात रवाना झाले असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या