Ticker

6/Breaking/ticker-posts

चौकशीला वेग ; ईडीला हवा एकनाथ खडसेंच्या 'त्या' कर्जाचा तपशील

 

*खडसे यांच्याविरुद्धच्या ईडी चौकशीला वेग.

*आता जळगाव जिल्हा बँकेला पाठवली नोटीस.

*खडसेंच्या कारखान्याला दिलेले कर्ज रडारवर.
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

जळगाव: भोसरी जमीन प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  एकनाथ खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असतानाच ईडीने जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे असलेल्या खडसेंच्या श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाची माहिती मागितली आहे. जिल्हा बँकेच्या प्रशासनाकडून बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने ही नोटीस जिल्हा बँकेला तीन ते चार दिवसांपूर्वीच बजावली आहे. त्याच्या अनुषंगाने जिल्हा बँकेने श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या संदर्भातील सविस्तर माहिती ईडीला सादर केल्याचे समजते. एकनाथ खडसे यांच्या कन्या अॅड. रोहिणी खड्से या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा आहेत. दुसरीकडे, त्या घोडसगाव येथील श्री संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षाही आहेत. त्यामुळेच जिल्हा बँकेने श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला कर्जाची माहिती ईडीने मागविली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथील साखर कारखान्यावर जळ्गाव जिल्हा बँक व शिखर बँकेचे कर्ज होते. हा कारखाना अवसायनात गेल्यानंतर तो शिखर बँकेने विक्रीस काढला. हा कारखाना खडसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विकत घेतला. २०१५-१६ मध्ये एकनाथ खडसे यांच्या पॅनलची जिल्हा बँकेवर सत्ता आली. त्यानंतर जिल्हा बँकेने श्री संत मुक्ताई साखर कारखान्याला दोन टप्प्यात सुमारे ७८ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले होते. पहिल्या टप्प्यात मंजूर झालेल्या कर्जाची परतफेड कारखान्यात वीजनिर्मिती करून केली जाणार होती. दुसऱ्या टप्प्यात कारखान्याला कर्ज मंजूर झाले तेव्हा जिल्हा बँकेच्या अध्यक्षा म्हणून अॅड. रोहिणी खडसे होत्या. त्या साखर कारखान्याच्या उपाध्यक्षाही आहेत. त्यामुळे हे कर्ज बेकायदेशीररित्या दिले असल्याच्या तक्रारीही यापूर्वी झाल्या होत्या.

ईडीने एक पत्र देऊन कारखान्याल्या दिलेल्या कर्जाची माहिती मागितली

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र देशमुख यांच्याशी याबाबत संपर्क केल्यावर त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. बँकेला ईडीने एक पत्र देऊन घोडसगावच्या श्री संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्यास दिलेल्या कर्जाची माहिती मागितली आहे. त्यात साखर कारखान्याला किती कर्ज दिले आहे, त्यातील किती कर्जाची परतफेड झाली आहे, कर्जाचे हफ्ते नियमित भरले जात आहेत का? अशा स्वरूपाची माहिती विचारली आहे. सरकारी यंत्रणांकडून अशा प्रकारची माहिती मागितली जाणे ही नियमित घटना आहे, असे देशमुख म्हणाले. बँकेने कारखान्याला ३० कोटी रुपयांचे कर्ज दिले असूनश्री संत मुक्ताई सहकारी साखर कारखाना त्याची नियमित परतफेड करत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या