Ticker

6/Breaking/ticker-posts

करोनाची तिसरी लाट महिनाअखेरीस ; महाराष्ट्राला बसणार सर्वाधिक फटका?

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मूंबई : देशातील करोनाची दुसरी लाट अजून संपलेली नसतानाच, तिसरी लाट येण्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार करोनाच्या तिसऱ्या लाटेची ही भविष्यवाणी गणिताच्या मॉडलनुसार करण्यात आली आहे. तसंच, या लाटेचा कळसबिंदू ऑक्टोबरमध्ये असेल, असेही या अंदाजात म्हटले आहे. याच अहवालानुसार देशात दुसऱ्या लाटेचा अंदाज या वर्षाच्या सुरुवातीला वर्तविण्यात आला होता. महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांना याही लाटेत अधिक फटका बसण्याची भीतीही वर्तविण्यात आली आहे.

हैदराबादमधील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) एम. विद्यासागर आणि कानपूर आयआयटीतील महिंद्र अग्रवाल यांनी हा अहवाल दिला आहे. या महिनाअखेरीसच तिसरी लाट सुरू होईल. तिचा कळसबिंदू ऑक्टोबरमध्ये गाठला जाईल. त्या वेळी दैनंदिन रुग्णसंख्या किमान एक लाखांपेक्षा कमी आणि कमाल सुमारे दीड लाख असेल, असाही अंदाज या प्रतिमानाने व्यक्त केला आहे. संसर्गाचे प्रमाण अधिक असणाऱ्या महाराष्ट्र, केरळ या राज्यांमध्येच रुग्णवाढ अधिक असेल,’ असे विद्यासागर यांनी म्हटले आहे.

 

अहमदनगरनं वाढवल टेंशन

राज्यात सध्या अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसतेय. सातारा, सांगली, कोल्हापूरमध्येही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाहीये. करोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पारनेर तालुक्यातील ४३ गावांत तर संगमनेर तालुक्यातील साकूर जिल्हा परिषद गटातील गावांत ३१ जुलै ते १० ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. अहमदनगरमधील वाढती रुग्णसंख्या हे तिसऱ्या लाटेचे संकेत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी जिल्ह्यात २९१ रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर, नवीन ८०० करोना बाधित रुग्णांची भर पडली असून ५,७४१ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. अहमदनगर जिल्ह्यात कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्याने रुग्ण वाढत असल्याचे आढळून आले आहे. तर, कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्यास कार्यक्रमांशी संबंधित सर्वांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

 

पश्चिम महाराष्ट्रासह शेजारील अहमदनगर जिल्ह्यात करोनाची वाढती रुग्णसंख्या तिसऱ्या लाटेचे संकेत देणारी आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्याचे घटलेल्या रुग्णसंख्येवरून दिसत असले तरी तिसरी लाट कोणत्याही क्षणी दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे. केरळ आणि आपल्या लगतच्या नगर जिल्ह्यात करोनाने थैमान घातले असून, तिसरी लाट जवळ आली आहे. लसीकरणानंतरही युरोप, अमेरिकेत तिसरी लाट जोमात आहे. करोनाची तिसरी लाट आपल्या दारापर्यंत येऊन ठेपल्याने त्यापासून वाचायचे असेल, तर करोना नियमांचे कठोर पालन करावे लागणार आहे. त्यामुळे नाशिककरांनी आतापासूनच सावध व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.

 

तिसरी लाट रोखायची असेल, तर लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. दोन मात्रांमधील अंतराचा निकष पाळून योग्यवेळी लसीकरण करणेही गरजेचे आहे, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. तसेच करोना विषाणूचे परावर्तित स्वरूप पाहता दुसरी मात्राही योग्य वेळी द्यायला हवी, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

 

करोनाची तिसरी लाट रोखणे हे नागरिकांच्यात हातात आहे. तोंडावर मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि सामाजिक अंतराची मर्यादा राखल्यास करोनाला दूर ठेवता येऊ शकते, असं आवाहन प्रशासन करत आहे. करोनाची संभाव्य तिसरी लाट धडकण्यापूर्वी प्रशासनाकडून अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पात्र नागरिकांना दुसरा डोस देऊन त्यांना करोनापासून सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाची धडपड सुरू आहे.

 

देशात दुसऱ्या लाटेत सध्या दैनंदिन रुग्णसंख्या ४० हजारांच्या आसपास स्थिरावली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण केरळमधील आहेत. पुढील लाटेचेही संसर्गकेंद्र (हॉटस्पॉट) केरळच असेल, असा अंदाज केंब्रिज विद्यापीठातील प्रा. पॉल कट्टूमन यांनी वर्तविला आहे. ईशान्य भारतातील काही छोट्या राज्यांतही रुग्णसंख्या अधिक असेल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी भारतासाठी कोव्हिड ट्रॅकर विकसित केला आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या