शेतकरी संघर्ष कृती समितीने अण्णा हजारे यांची घेतली भेट
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
पारनेर : पुणे-नाशिक
हायस्पीड रेल्वे मार्गासाठी पुणे जिल्ह्यातील बागायती शेती संपादित केली जाणार
आहे. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे. यासाठी स्थापन करण्यात
आलेल्या शेतकरी संघर्ष कृती समितीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली.
त्यावेळी हजारे यांनी या शेतकऱ्यांना आपला पाठिंबा असल्याचे सांगितले.
'बागायती शेतीतून असे प्रकल्प होता
कामा नयेत, यासाठी वेळ पडली तर आंदोलन करा, करोनाची परिस्थिती निवळल्यानंतर आपण स्वत: आंदोलनात सहभागी होऊ,' असं आश्वासन अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांना दिले.
कृती समिती व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी
राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारे यांची भेट घेऊन आपली समस्या सांगितली. पुणे -नाशिक
हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होऊन त्यांची घरे रेल्वे
मार्गात जाणार आहेत. जुन्नर तालुक्यातील संपूर्ण क्षेत्र बागायती आहे.
तालुक्यामध्ये पाच धरणे, कालवे,
चाऱ्या आणि पुणे-नाशिक महामार्ग यासाठी यापूर्वीच तालुक्यातील
अनेकांच्या जमिनी गेल्या आहेत. रेल्वेमार्गात आणखी जमीन गेल्यास अनेक शेतकरी
अल्पभूधारक व अत्यल्पभूधारक होणार आहेत. अनेक जणांचे कुटुंब उद्ध्वस्त होऊन
त्यांच्या उपजीविकेचे संकट निर्माण होणार आहे. अनेक लोकांचे पशुधन व पिण्याचे
स्रोत हे कायमस्वरूपी नष्ट होणार आहेत. शेतकऱ्यांना रेल्वेमुळे अनेक अडचणी उभ्या
राहणार आहेत, कुकुटपालन, दुग्ध व्यवसाय
सुद्धा धोक्यात येणार आहे, अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी हजारे
यांना दिली.
अण्णा
हजारे यांनी शेतकऱ्यांची बाजू समजून घेतली. त्यानंतर बोलताना हजारे म्हणाले की, 'कुठलाही प्रकल्प बागायत क्षेत्रातून नेता येत
नाही. जर सरकार तुमचे ऐकत नसेल तर तुम्ही आंदोलन करा. वेळ आली तर शेतकऱ्यांनी
जेलभरो आंदोलनाची सुद्धा तयारी ठेवावी. मी तुमच्या आंदोलनात सहभागी होऊ शकलो असतो,
परंतु सध्या करोनामुळे ते शक्य नाही. करोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर
मी तुमच्या आंदोलनात सहभागी होईल. तुमच्या शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा
आहे. या शेतकरी आंदोलनाला माझा जाहीर पाठिंबा आहे,' असं
आश्वासन अण्णा हजारे यांनी दिले.
0 टिप्पण्या