लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून
आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी शिवाजी
पार्क
येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेत अभिवादन केले. त्यानंतर शिवसैनिकांनी
स्मृतिस्थळाचे शुद्धिकरण केले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बाळासाहेब ठाकरे
यांच्या स्मृतिस्थळाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी येथे येत स्मृतिस्थळ गोमुत्र
शिंपडून, तसेच दुधाचा अभिषेक
करत त्याचे शुद्धिकरण केले. नारायण राणे यांच्या येण्याने हा परिसर अशुद्ध झाला
होता, असे या शिवसैनिकांचे म्हणणे आहे.
स्मृतिस्थळाचे
शुद्धीकरणारा शिवसैनिक कोण?
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे शुद्धिकरण
करणाऱ्या शिवसैनिकाचे नाव आहे आप्पा पाटील. आप्पा पाटील यांनीच स्मृतिस्थळाचे
शुद्धिकरण केले. आप्पा पाटील हे आपल्या दिवसाची सुरूवातच बाळासाहेब ठाकरे यांच्या
स्मृतिस्थळावर पूजा करून करतात असे त्यांनी सांगितले. यावेळी ते स्मृतिस्थळावर
फुले वाहून वंदन करतात. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठरल्याप्रमाणे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते
प्रवीण दरेकर आणि इतर भाजप कार्यकर्त्यांसोबत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला भेट
दिली. या पूर्वी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या
स्मृतिस्थळाच्या भेटीच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवला होता. या वेळी त्यांनी
नारायण राणे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. नारायण राणे यांना बाळासाहेब
ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण नारायण राणे
यांच्यासारखा बाडगा आणि बाळासाहेबांशी बेईमानी करणारा नेता या महाराष्ट्रात दुसरा
नाही, असे प्रहार राऊत यांनी राणे
यांच्यावर केली होती.
ही टीका करत असताना राऊत यांनी नारायण राणे यांना बाळासाहेब
ठाकरे यांच्या स्मृतिस्मारकाजवळ येऊ देणार नाही, असे जाहीर
केले होते. त्यानंतर भाजप नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. यानंतर
राणे आज स्मृतिस्थळावर जातील की ही भेट रद्द करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले
होते. मात्र ठरल्याप्रमाणे राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मारकाला भेट दिली.
मुळात शिवसेनेला
शुद्धिकरणाची गरज-शेलार
या घडामोडींवर दुखावलेल्या भाजपने सेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
शिवसैनिकांच्या या शुद्धिकरणावर भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी टीकास्त्र सोडले आहे. शिवसेनेला
शुद्धिकरण करण्यासाठी शुद्ध अस्तित्व आणि अधिष्ठान आहे का, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.
सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने सोनिया गांधी यांच्या नावाची शपथ घेतली आणि
काँग्रेसशी सलगी केली. अशा शिवसेनेला मुळात शुद्धिकरणाची गरजच काय, असे टीकास्त्र आशीष शेलार यांनी विचारला आहे.
0 टिप्पण्या