Ticker

6/Breaking/ticker-posts

भाजप आणखी एका यात्रेच्या माध्यमातून जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर; नगर जिल्हयातुन सुरुवात









 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

अहमदनगर  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार केंद्र सरकारमध्ये नव्याने समावेश झालेल्या मंत्र्यांनी आपापल्या भागात जन आशीर्वाद यात्रा सुरू केली आहे. त्यासंबंधी विविध चर्चाही सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी पक्षाकडून आणखी एका यात्रेचे संकेत मिळत आहेत. पक्षाच्या किसान मोर्चातर्फे संवाद यात्रा काढून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचण्याची भाजपची योजना आहे. माजी मंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंबंधीच्या सूचना भारतीय जनता पक्षाच्‍या किसान मोर्चाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या संवाद यात्रेतून केंद्र सरकारच्‍या शेतकरी विषयक योजनांची माहिती शेतक-यांच्‍या बांधावर जावून द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

करोनाच्या परिस्थितीतही भाजपने विविध आंदोलने, कार्यक्रम, उपक्रम आणि यात्रा या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेते, कार्यकर्ते या माध्यमांतून सतत जनेतेमध्ये राहत आहेत. राज्यातील आघाडी सरकारविरोधात वातावरण निर्माण करण्यासोबतच केंद्रातील भाजप सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी याचा उपयोग केला जात आहे. यामुळे करोनाच्या काळात संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याची टीका होत असली तरी त्याची पर्वा न करता भाजपचे हे उपक्रम सुरू आहेत. सध्या केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे.

यासोबतच आता शेतकऱ्यांसाठी अशीच एक संवाद यात्रा सुरू करण्याची पक्षाची तयारी सुरू असल्याचे दिसून येते. विखे पाटील यांनी यासंबंधीचे संकेत दिले आहे. २२ ऑगस्टला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची जयंती आहे. राज्य सरकारतर्फे दरवर्षी तिथीनुसार नारळी पौर्णिमेच्या दिवशी हा दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विखे पाटील परिवारातर्फेही विविध उपक्रम राबविले जातात. यापार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्‍या किसान मोर्चाच्‍या वतीने पदाधिका-यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये बोलताना विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी संवाद यात्रा काढण्याचे आवाहन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या