Ticker

6/Breaking/ticker-posts

शरद पवारांच्या नावाने आणखी एक धमकीचा फोन; ५ कोटी दे नाहीतर...!

 

*शरद पवार यांच्या नावाने चाकणमध्येही धमकी.

*पाच कोटींच्या वसुलीसाठी पवारांचा आवाज काढला.

*धमकावण्यासाठी आरोपींकडून कॉल स्पूफिंग अॅपचा वापर.


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पिंपरी चिंचवड: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने फोन करून दबाव टाकला गेल्याची दोन प्रकरणं एकाच दिवशी समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मंत्रालयापाठोपाठ चाकण भागातही अशाच प्रकारचा कॉल करून पैशांच्या वसुलीसाठी एका व्यक्तीला धमकावण्यात आले आहे. हा कॉल ९ ऑगस्ट रोजी करण्यात आला होता, असे स्पष्ट झाले असून याप्रकरणी तीन जणांना मुंबईत अटक करण्यात आली आहे.


शरद पवार यांच्यासारखा आवाज काढून फोनवर ५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याची बाब समोर येताच पोलीसही चक्रावून गेले आहेत. याबाबत जी माहिती समोर आली आहे ती धक्कादायक आहे. याप्रकरणी प्रताप खंडेभराड यांनी फिर्याद दिली असून त्याआधारे पिंपरी चिंचवडमधील चाकण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रताप खंडेभराड यांना धिरज पठारे या व्यक्तीने २०१४ मध्ये एक कोटी इतकी रक्कम कर्जाऊ दिली होती. ही रक्कम आता व्याजासह ५ कोटी इतकी झाली असून ती मिळावी, यासाठी खंडेभराड यांच्याकडे तगादा सुरू होता. खंडेभराड यांनी स्वत:च्या मालकीची १३ एकर जमीन धीरज याला दिली. मात्र, त्यानंतरही त्याची पैशांची मागणी कायम होती. वारंवार पैसे मागूनही खंडेभराड पैसे देत नसल्यानेच धीरज याने गुरव आडनावाच्या सहकाऱ्यामार्फत शरद पवार यांच्यासारखा आवाज काढून खंडेभराड यांना धमकावल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पवार यांच्यासारखा आवाज काढण्यासाठी कॉल स्पूफिंग अॅपचा वापर आरोपींकडून करण्यात आला. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानातील लँडलाइनवरून फोन केल्याचे दाखवून आरोपींनी दिशाभूल केल्याचेही स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तीन जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली असून त्यांना चाकण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. याप्रकरणाची पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त क्रुष्ण प्रकाश यानी गंभीर दखल घेतली असून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तपासाच्या अनुषंगाने सूचना दिल्या आहेत.

मंत्रालयात बदल्यांसाठी फोन!

शरद पवार यांच्यासारखा हुबेहूब आवाज काढून बुधवारी मंत्रालयातील गृह विभागातही एक फोन कॉल करण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत समोरच्या व्यक्तीने विचारणा केली व फोन ठेवला. याबाबत मंत्रालयातील संबंधित अधिकाऱ्याने गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून त्याआधारे गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून दोन्ही प्रकरणांतील आरोपी सारखेच असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या