Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवचरित्र पोहोचणार आता घरोघरी ; सारथी वाटणार ५० हजार प्रती

 

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 कोल्हापूरः शिवाजी महाराजांचे चरित्र आणि विचार राज्यातील घराघरात पोहोचविण्यासाठी सारथी ने पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी संकलित केलेले 'छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ' या पुस्तकाच्या पन्नास हजार प्रती प्रकाशित करण्यात येणार आहेत. त्याच्या प्रती घरोघरी मोफत पोहोचविण्यात येणार असल्याने या निमित्ताने शिवचरित्र आणि त्यांचे विचार गावागावात आणि मनामनात पाहोचण्यात मदत होणार आहे.

युतीच्या काळात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर छपत्रती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्थापना करण्यात आली. मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा निर्णय रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आता सारथीच्या उपक्रमांना गती आली आहे. पुण्यातील प्रमुख केंद्राबरोबरच आता राज्यात अनेक उपकेंद्र स्थापन करण्यात येत आहेत. संस्थेला विविध उपक्रमासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. यातून आता शिवचरित्र घरोघरी मोफत पोहोचविण्यात येणार आहे. डॉ.जयसिंगराव पवार यांनी सोळा लेखांचे संकलन करून 'छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ' हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

या पुस्तकाच्या ५० हजार प्रतींचे छपाई महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) पुणे यांच्याकडून करुन घेऊन त्या प्रतींचे मोफत वाटप करण्यात येणारआहे.

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादित केलेल्या या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांचे शिक्षण, राज्यकारभार, व्यक्तिमत्त्व, नेतृत्व, गुण, हिंदवी स्वराज्य स्थापना, कामगिरी, अर्थनीती, धर्मनिरपेक्षता, संरक्षण व लष्करी व्यवस्था, किल्ले आदी विषयांवरील अभ्यासपूर्ण लेख समाविष्ट आहेत. डॉ.आ.ह.साळुंखे, डॉ.आप्पासाहेब पवार, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गो. स. सरदेसाई, कृष्णराव केळूसकर, सर जदुनाथ सरकार, डॉ. बाळकृष्ण, त्र्यंबक शंकर शेजवलकर, वा.सी. बेंद्रे, श्री. सेतुमाधवराव पगडी, डॉ. अ. रा. कुलकर्णी, प्रा.नरहर कुरुंदकर, ले. कर्नल म.ग.अभ्यंकर, ड.भा.कृ.आपटे, श्री. गो. नि. दांडेकर व प्रा. ग. ह. खरे या प्रख्यात इतिहास संशोधकांनी शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व व राजनीती यांचे विविध पैलू उलगडले आहेत. त्यामुळे हा महत्त्वाचा संदर्भ ग्रंथ झाला आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिग्रंथ' या पुस्तकाचे बालभारती, पुणे या संस्थेकडून एका महिन्यात छपाई पूर्ण करून सारथीमार्फत विविध शासकीय संस्था, शासकीय व निमशासकीय ग्रंथालये, ग्रामपंचायती व स्थानिक स्वराज्य संस्थांना विनामुल्य वितरण करण्यात येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या