Ticker

6/Breaking/ticker-posts

‘ माझा स्टॅन स्वामी होऊ नये !’ ; सचिन वाझेने व्यक्त केली कोर्टात भीती

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटकं आणि याच कारचा मालक मनसुख हिरेन याची ठाण्यात झालेली हत्या या प्रकरणात अटकेत असलेला आणि मुम्बई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझे याला हृदयविकारावरील उपचारांबाबत कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. दरम्यान, वाझेला आणखी दोन दिवसांची एनआयए कोठडी देण्याची विनंती कोर्टाने फेटाळली आहे.

सचिन वाझेने हृदयविकारावर खासगी रुग्णालयात उपचार घेण्याविषयी विशेष एनआयए कोर्टाकडे परवानगी मागितली होती. त्यात कोकिलाबेन, सुराना किंवा सैफी रुग्णालय यापैकी एका रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळावी, असे नमूद करण्यात आले होते. माझी गत कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे होऊ नये, अशी भीतीही वाझेने कोर्टासमोर व्यक्त केली. वाझेचे म्हणणे ऐकल्यानंतर विशेष एनआयए कोर्टाने खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास परवानगी दिली. त्यानुसार आता वाझे याला सुराना रुग्णालयामध्ये उपचार घेता येणार आहेत. सचिन वाझे याच्यावर ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार आहे. तसा रिपोर्ट मुंबईतील जे. जे. रुग्णालयातून देण्यात आला आहे. जे. जे. रुग्णालयात हृदयविकाराच्या अनुषंगाने विविध तपासण्या करण्यात आल्या. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिल्याचे वाझेच्या वकिलांनी कोर्टात सांगितले होते.


दरम्यान, सचिन वाझे याची आणखी चौकशी करण्यासाठी दोन दिवसांकरिता ताबा देण्याची विनंती एनआयएने केली होती. ही विनंती विशेष एनआयए कोर्टाने फेटाळली. वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

स्टॅन स्वामींचे उदाहरण का दिले?

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचा काही महिन्यांपूर्वीच मृत्यू झाला. निधनसमयी ते ८४ वर्षांचे होते. स्वामी यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. तिथे असतानाच प्रकृती अधिक खालावल्यानंतर त्यांना वांद्रे येथील होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हायकोर्टात स्वामी यांनी जामिनासाठी अर्ज केला होता मात्र न्यायालयीन कोठडीदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी हायकोर्टाने दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आज वाझे याच्या वकिलांनी खासगी रुग्णालयात उपचारांसाठी परवानगी मागताना याच घटनेचा दाखला दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या