Ticker

6/Breaking/ticker-posts

महाराष्ट्रात आता 'झिका' विषाणूचा शिरकाव; पुणे जिल्ह्यात पहिला रुग्ण

 

·*महाराष्ट्रात 'झिका' विषाणूचा शिरकाव


·  *पुणे जिल्ह्यात आढळला पहिला रुग्ण.

· *पुरंदर तालुक्यात महिलेला झाली लागण.

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 पुणे:  करोना ससंर्गाची तीव्रता कमी होत नाही तोच पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर मध्ये झिकाविषाणूचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील हा 'झिका'विषाणूचा पहिला रुग्ण ठरला आहे. एका ५० वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआयव्ही) केलेल्या तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये झिकाआजाराचा एक रुग्ण आढळून आला असून हा महाराष्ट्रातील पहिला झिका रुग्ण आहे. बेलसर हे सुमारे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. या ठिकाणी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून तापाचे रुग्ण आढळून येत होते. त्यातील पाच रुग्णांचे नमुने १६ जुलैला राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) येथे तपासण्यासाठी पाठविले असता त्यापैकी तीन जणांना चिकुनगुनिया आजाराचे निदान झाले. २७ ते २९ जुलै या कालावधीत एनआयव्हीने डेंगी, चिकुनगुनिया विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील तज्ञांनी बेलसर आणि परिंचे या भागात भेट देऊन सुमारे ४१ संशयित रुग्णांचे रक्तजल नमुने संकलित केले. त्यापैकी २५ जणांना चिकनगुनिया, तर तीन जणांना डेंगीचा आजार असल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले. बेलसर गावातील एका पन्नास वर्षाच्या महिलेस झिका विषाणू आजाराची बाधा झाल्याचा निष्कर्ष शुक्रवारी प्रयोगशाळेने दिला आहे. हा महाराष्ट्रात आढळलेला पहिला झिकारुग्ण आहे. या महिलेला चिकुनगुनियाची देखील बाधा झाली असून हा मिश्र विषाणू संसर्ग आहे,’ अशी माहिती राज्य रोग सर्व्हेक्षण अधिकारी

पुरंदर तालुक्यात बेलसरमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळल्याने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, तसेच राज्य रोग सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, सहायक संचालक डॉ. बबिता कमलापूरकर, राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ.महेंद्र जगताप या तज्ज्ञांच्या पथकाने बेलसर गावास भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. बेलसर गावासह परिसरातील गावांमध्ये सिरो सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राज्य शीघ्र प्रतिसाद पथकाच्या मार्गदर्शनानुसार पुढील कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेलसर गावात डेंगी, चिकुनगुनियाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे त्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेताना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले. त्यामुळे गावासह अन्य गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे,’ असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी सांगितले.

झिका आणि इतर किटकजन्य आजारासाठी सर्वेक्षण सक्षम करताना कोविड सर्वेक्षण आणि लसीकरणाकडे दुर्लक्ष होणार नाही, याबाबत दक्षता घेण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत - डॉ. प्रदीप आवटे, रोग सर्व्हेक्षण अधिकारी

पुरंदर तालुक्यात डाळिंबाचे उत्पादन मोठे होते. केरळ येथे त्याची मोठी बाजारपेठ आहे. येथील उत्पादक डाळिंब विक्रीसाठी केरळला दरवर्षी जातात. दरम्यान, डेंगी, चिकुनगुनियाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून आल्याने त्या चाचण्यांमधून महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. महिलेने कोणताही प्रवास केला नाही. तरीही संसर्ग झाला आहे- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या