Ticker

6/Breaking/ticker-posts

औरंगाबादचे संभाजीनगर नामांतरप्रश्नी सुभाष देसाईंचे मोठे विधान, म्हणाले...

 






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

औरंगाबाद: औरंगाबाद शहराचे नाव बदलण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना गंभीर असून आता नामांतराची हीच अनुकूल वेळ आहे असे देसाई यांनी म्हटले आहे.

ते एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबाद या शहराचं नाव संभाजीनगर असे केले होते. बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धव ठाकरे आता राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांना पाठिंबा देणारे दोन पक्ष देखील सत्तेत आहेतअसे सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते आता याबाबत लवकरच निर्णय घेतीलअसे सुभाष देसाई म्हणाले.

काही तांत्रिक समस्या असून त्यावर लवकरच तोडगा निघेल असेही ते पुढे म्हणाले. या पूर्वी विभागीय आयुक्तांकडे नामांतराबाबतचा प्रस्तावही पाठवण्यात आला आहे. हे पाहता आता औरंगाबादचे संभाजीनगर असे नाव करण्याची ती वेळ आलेली आहे आणि लवकरच राज्य सरकार याबाबत निर्णय घेईल असे ते म्हणाले.

खासदार इम्तियाज जलील यांनी दर्शवला विरोध

औरंगाबाद या शहराचा विकास करणे गरजेचे असून हे शहर पंचतारांकित श्रेणीत आणा. इथे लोकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि नाव काय बदलता, असे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.


काँग्रेसनेही दर्शवला होता विरोध

दरम्यान, काँग्रेसने औरंगाबादचे नाव बदलण्याला विरोध दर्शवला होता. काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतराला विरोध असल्याचे म्हटले होते. आता नव्याने उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नामांतराचा मुद्दा छेडल्याने आता काँग्रेसची भूमिका काय आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या