Ticker

6/Breaking/ticker-posts

राज्यात पुढचे ३ दिवस मुसळधार; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट

 
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई : ऑगस्ट महिन्यात दडी मारलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा राज्यात हजेरी लावली आहे. राज्यात मान्सूनसाठी पूरक वातावरण तयार झाले असून पुढच्या तीन तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

आज कोकणासह मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे. हीच परिस्थिती पुढच्या तीन दिवस राहणार असून मुंबईतही पाऊसाचा जोर पाहायला मिळेल असं हवामान खात्याचे म्हणणे आहे. आज राज्यात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने त्याचा परिणाम राज्यभर होणार असून कोकणसह मध्य महाराष्ट्रातही मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. इतकंच नाहीतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विकेंडनंतर सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, लातूर, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यांना यलो अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे.

आज सोमवारी पुणे, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खरंतर, गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, कोकण, विदर्भ आणि सर्वदूर भीषण परिस्थिती ओढावली होती. मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. पण सध्या जिल्ह्यांमध्ये पावसाने दडी मारली आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या