Ticker

6/Breaking/ticker-posts

टी-२० वर्ल्डकप पाकिस्तानच्या कर्णधारचे विराट आणि भारताला आव्हान, पाहा काय म्हणाला.

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

दुबई: आयसीसीने काल १७ ऑगस्टला टी-२० वर्ल्डकपच्या वेळापत्रकाची घोषणा केली. या स्पर्धेत ग्रुप बी मधील पहिली लढत भारत आणि पाकिस्तान यांच्यात २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या दोन्ही देशातील नव्हे तर संपूर्ण क्रिकेट विश्वाला या सामन्याची प्रतिक्षा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या या लढती संदर्भात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची पहिली प्रतिक्रिया आली आहे.

टी-२० वर्ल्डकपचे आयोजन या वर्षी भारतात होणार होते. पण करोनामुळे ही स्पर्धा युएई आणि ओमान येथे खेळवली जाईल. भारताविरुद्धच्या लढती संदर्भात आयसीसीच्या वेबसाइटवर बोलताना आझम म्हणाला, आमच्या संघासाठी टी-२० वर्ल्डकप म्हणजे घरच्या मैदानावर खेळल्या सारखे आहे. या स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे आता आम्ही तयारीला लागलो आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या मालिकेचा आम्ही यासाठी वापर करून घेऊ. भारताविरुद्धच्या लढती संदर्भात बाबर आझम म्हणाला, या बुहप्रतिक्षित लढतीची प्रतिक्षा संपली आहे. भारताविरुद्ध आम्ही पूर्ण तयारी केली आहे.

गेल्या एका दशकापासून पाकिस्तान संघ युएईमध्ये सर्वाधिक सामने खेळला आहे. यामुळे ही स्पर्धा आमच्यासाठी घरच्या मैदानासारखी असेल. आम्ही गेल्या काही वर्षात प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आयसीसी टी-२० क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचलो आहोत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात अखेरची लढत २०१६ साली झाली होती. ही लढत देखील टी-२० वर्ल्डकपमध्येच झाली होती. तेव्हा टी-२० वर्ल्डकपमध्ये कोलकाता येथील लढतीत भारताने पाकिस्तानचा ६ विकेटनी पराभव केला होता. दोन्ही संघात ५ वेळा टी-२० वर्ल्डकपमध्ये लढत झाली असून या सर्व लढतीत भारताने विजय मिळवला आहे. तर एकूण टी-२० च्या ८ पैकी ७ लढतीत भारताने विजय मिळवला आहे. एक लढत टाय झाली होती तेव्हा भारताने बॉल आउटमध्ये विजय मिळवला.

आयसीसीच्या स्पर्धेत कोणत्याही सामन्यापेक्षा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत सर्वाधिक पाहिली जाते. आतापर्यंत झालेल्या ६ टी-२० वर्ल्डकपमध्येच फक्त दोन वेळा २००९ आणि २०१० मध्ये या दोन्ही संघात लढत झाली नाही. २००७च्या वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघांत फायनलसह दोन लढती झाल्या होत्या. २०१२ मध्ये सुपर-८ आणि २०१४ व २०१६ मध्ये ग्रुप फेरीत या दोन्ही संघात लढती झाल्या होत्या.

 

 

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या