*माजी खासदार चंद्रकांत
खैरे यांचे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप
*दानवेंनी पैसे वाटून
लोकसभा निवडणुकीत मला पाडलं!
*भागवत कराड यांना मी महापौर केलं, ते माझ्याकडं येतील - खैरे
लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
औरंगाबाद: 'महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष असताना रावसाहेब दानवे यांनी माझ्या विरोधात काम केलं. हॉस्पिटलमध्ये बसून पैसे वाटले आणि मला
पाडलं. त्यांना मंत्रिपदाच्या शुभेच्छा कशाकरता द्यायच्या?,' असा संतप्त सवाल शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला
आहे.
ते औरंगाबादमध्ये बोलत होते. अलीकडंच
झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मराठवाड्यातून भागवत कराड यांची मंत्रिपदी
वर्णी लागली. तर, रावसाहेब
दानवे यांना रेल्वेसारख्या महत्त्वाच्या खात्याचं राज्यमंत्रिपद देण्यात आलं.
मराठवाड्यातील एक प्रमुख नेते असलेले चंद्रकांत खैरे यांनी या दोघांचंही अभिनंदन न
केल्याची चर्चा होती. त्याचं कारण त्यांना विचारलं असता, भागवत
कराड यांचं पहिल्याच दिवशी अभिनंदन केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, दानवे यांना शुभेच्छा दिल्या नाहीत, असं सांगून
त्यामागचं कारणही त्यांनी स्पष्ट केलं. ' दानवे हे
महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष असताना त्यांनी मला पाडलं. हॉस्पिटलमध्ये बसून पैसे
वाटप केलं, आमचे नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे
नगरसेवक तेव्हा फुटले नाहीत. मग त्यांनी भाजपच्या १५ नगरसेवकांना फितवलं. त्यांना
पैसे देऊन माझ्या विरोधात काम करायला सांगितलं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना ही
गोष्ट कळल्यानंतर त्यांनी खबरदारी घेतली. मात्र, तरीही
अर्ध्या भाजपनं माझ्या विरोधात काम केलं,' असा आरोप खैरे
यांनी केला.
भागवत कराडांना मी महापौर केलं!
' शिवसेनेला शह देण्यासाठी कराडांना
मंत्रिपद दिलं असेल तर चांगलं आहे. भाजपची रणनीती काय आहे हे आम्हाला कळलं आहे.
शिवसैनिक अधिक सावध होऊन काम करतील,' असं खैरे म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत कराड यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. याबाबत विचारलं असता,
आमची काही हरकत नाही, असं खैरे म्हणाले. '
औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. युतीमध्ये सुद्धा ही जागा
शिवसेनेकडं होती. महाविकास आघाडीमध्येही ही जागा शिवसेनेकडंच राहणार आहे. त्यामुळं
काही प्रश्न नाही. माझी राजकीय उंची खूप मोठी आहे. शिवसेनाप्रमुखांच्या
आशीर्वादानं मी कराड यांना नगरसेवक, महापौर केलं. गोपीनाथ
मुंडेही त्यावेळी होते. आता कराडांना मोठं पद मिळालं असेल. पण मी त्यांना खूप
सीनियर आहे. ते आजही मला नेता मानतात. त्यामुळं ते येतीलच माझ्याकडं,' असं खैरे यांनी सांगितलं.
0 टिप्पण्या