Ticker

6/Breaking/ticker-posts

अमित शहां- पवार भेट तर्क-वितर्क; 'हीच' वेळ का निवडली ?

 

शरद पवार घेणार अमित शहा यांची भेट

सहकार क्षेत्रातील प्रश्नांवर चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती

राजकीय वर्तुळात मात्र उलटसुलट चर्चा
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

मुंबई: एकीकडं देशभरातील विरोधक केंद्रातील मोदी सरकारविरोधात एकत्र येण्याची व अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखत असताना दिल्लीच्या वर्तुळात आज वेगळीच घडामोड घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत आहेत. पवार यांनी अलीकडंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता ते शहांना भेट असल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.

अलीकडंच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करताना पंतप्रधान मोदी यांनी सहकार विषयाचं स्वतंत्र खातं निर्माण केलं आहे. या खात्याची जबाबदारी अमित शहा यांच्याकडं दिली आहे. सहकार क्षेत्राचा दांडगा अभ्यास असलेल्या शहांकडं या खात्याची जबाबदारी आल्यामुळं महाराष्ट्रातील सहकारावर वर्चस्व असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार व शहा यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत सहकार क्षेत्रातील प्रश्नावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पवार कुटुंबीयांच्या नातलगाच्या ताब्यात असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीनं अलीकडंच जप्ती आणली आहे. त्यामुळं हजारो ऊस उत्पादक शेतकरी व कारखान्यातील कामगारांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. याबाबतही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पातळीवर मोदी विरोधी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्या नुकत्याच दिल्लीतही जाऊन आल्या. सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी त्यांची भेट झाली. मात्र, शरद पवारांशी चर्चा होऊ शकली नाही. खरंतर, राष्ट्रीय पातळीवर मोदींच्या विरोधात एखादी सशक्त आघाडी उभी राहावी, अशी पवारांचीही इच्छा आहे. मागील महिन्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या पुढाकारानं खुद्द शरद पवार यांच्या घरी काही नेत्यांची बैठक झाली होती. त्यामुळं शरद पवार देशपातळीवर नवा प्रयोग करत असल्याचं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा विरोधक एकत्र येत आहेत. राहुल गांधी यांनी आजच विरोधी पक्षाच्या नेत्यांना चहापानासाठी बोलावलं होतं. असं असताना शरद पवार हे अमित शहांना भेटत असल्यानं ते कोणती नवी खेळी खेळत आहेत, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या