Ticker

6/Breaking/ticker-posts

उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री; १३ प्रमुख राज्यांत 'असे' झाले सर्वेक्षण

 *देशातील प्रमुख १३ राज्यांत घेण्यात आले सर्वेक्षण.

*सर्वेक्षणात ठाकरेंबाबत ४९ टक्के मते सकारात्मक.







लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: करोना संसर्गाच्या काळात सक्षमपणे महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. प्रश्नम या संस्थेने देशातील प्रमुख १३ राज्यांत सर्वेक्षण घेतले असून त्यात इतर मुख्यमंत्र्यांना मात देत उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय ठरले आहेत. दरम्यान, राज्यातील विरोधी पक्ष भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतानाच समोर आलेले हे सर्वेक्षण महाविकास आघाडी आणि शिवसेनेला बळ देणारे ठरणार आहे.

प्रश्नम या संस्थेने आपला त्रैमासिक अहवाल नुकताच जाहीर केला. त्यात लोकप्रियतेच्या बाबतीत उद्धव ठाकरे हे सर्वात पुढे असल्याचे स्पष्ट झाले. ' उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून कामगिरी चांगली आहे आणि आम्ही पुन्हा त्यांना मतदान करू' असे मत सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ४९ टक्के मतदारांनी नोंदवले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे आहेत. त्यांच्या कामगिरीला ४४ टक्के सकारात्मक मते मिळाली आहेत. तर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे तिसऱ्या स्थानी असून ४० टक्के मते गेहलोत यांच्या पारड्यात पडली आहेत. लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन चौथ्या तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पाचव्या स्थानी राहिले आहेत.

सर्वेक्षणात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याबद्दल ६० टक्के नकारात्मक मते नोंदवली गेली आहेत. त्यांची कामगिरी खराब असल्याचा शेरा देतानाच ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नकोत, असा कौल दिला गेला आहे. केवळ १५ टक्के लोकच अमरिंदर यांच्या कारभारावर समाधानी आहेत पण पुन्हा त्यांना मत देणार नाही, असे त्यांनी सांगितले. उत्तराखंडमध्ये भाजपने नेतृत्वबदल केला आहे. मात्र आधीचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांच्याबद्दल या सर्वेक्षणात तब्बल ८० टक्के मते नकारात्मक होती. उत्तराखंड आणि पंजाबनंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबाबत नकारात्मक मते नोंदवली गेली आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता भाजप आणि काँग्रेससाठी हे सर्वेक्षण चिंतेत भर टाकणारे ठरणार आहे.

या मुद्द्यांवर घेतली मते...
१. कामगिरी खराब आहे आणि मुख्यमंत्री म्हणून पुन्हा नको.
२. कामगिरी ठिक आहे पण पुन्हा मत देणार नाही.

३. कामगिरी चांगली आहे आणि पुन्हा हाच मुख्यमंत्री व्हावा.
४. तटस्थ

* महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, तेलंगण, बिहार, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, गोवा आणि हरयाणा या १३ राज्यांत हे सर्वेक्षण घेण्यात आले. यात एकूण १७ हजार ५०० मतदारांची मते जाणून घेण्यात आली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या