Ticker

6/Breaking/ticker-posts

खा.प्रीतम मुंडेंना मंत्रिपद डावलल्याने नाराजीचा स्फोट; भाजपात राजीनामासत्र

 *भाजपमधील कलह चव्हाट्यावर, ११ तालुकाध्यक्षांनी दिला राजीनामा

*बीडपाठोपाठ नगर जिल्ह्यातील पदाधिकारीही आक्रमक पवित्र्यात

लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 बीड : केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील ४ खासदारांना संधी देण्यात आली. मात्र केंद्रीय मंत्रिपदासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ज्या नावाची चर्चा होती त्या परळीच्या भाजप खासदार प्रीतम मुंडेंना यांना डावलण्यात आलं. या मुद्द्यावरून सोशल मीडियावर मुंडे समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात असतानाच आता थेट भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरू झालं असून बीड जिल्ह्यातील भाजपच्या सर्वच ११ तालुकाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसंच याशिवाय इतरही काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत आपली नाराजी व्यक्त केली.

'केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपमधील आयारामांना संधी देण्यात आली, मग महाराष्ट्रात भाजपचा विस्तार करण्यात सिंहाचा वाटा असणाऱ्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीचं काय चुकलं होतं,' असा सवाल करत प्रीतम मुंडे यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर पक्षाविरोधातील नाराजी बोलून दाखवली जात आहे. त्यातच आता थेट पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

या पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

१. अ‍ॅड सुधीर घुमरे पाटोदा-तालुका अध्यक्ष

२. भगवान केदार तालुका अध्यक्ष केज

३. अरुण राऊत तालुका अध्यक्ष माजलगाव

४. सतीश मुंडे परळी

५. बाळासाहेब तोंडे धारूर

६. पोपट शेंडगे वडवणी

७. अच्युत राव गंनगे अंबेजोगाई

८. डॉ मदुसूदन खेडकर-शिरुर

९. डॉ वासुदेव नेहरकर-वैद्यकीय आघाडी जिल्हा अध्यक्ष

१०. डॉ लक्ष्मण जाधव भटके-विमुक्त आघाडी

११. बबन सोळंके -जिल्हा सचिव भाजप

१२. धनंजय घोळवे- दिव्यांग आघाडी

१३. संग्राम बांगर- विद्यार्थी आघाडी जिल्हा अध्यक्ष

१४. प्रदीप नागरगोजे-विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष

बीडपाठोपाठ नगरमध्येही राजीनाम्याचं सत्र

खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपद न मिळाल्याने बीड जिल्ह्यात सुरू झालेल्या नाराज कार्यकर्त्यांच्या राजीनाम्याचे सत्र नगर जिल्ह्यातही पोहोचलं आहे. भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अंबादास ढाकणे यांनी राजीनामा देत पक्षाच्या भूमिकेला विरोध दर्शवला आहे.

मुंडे समर्थकांची खदखद

राज्यात २०१४ साली भाजप-शिवसेना युतीचं सरकार आल्यानंतर काही दिवसांनंतरच पक्षांतर्गत संघर्ष सुरू झाल्याची चर्चा होऊ लागली होती. पंकजा मुंडे यांना ग्रामविकास खातं तर मिळालं होतं, मात्र नंतरच्या काळात पक्षनेतृत्वाकडून त्यांचे पंख छाटण्यासाठी प्रयत्न करण्यात आल्याचं बोललं गेलं. तसंच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनाही पक्षाकडून विधानपरिषदेसाठी संधी देण्यात आली नाही.

पंकजा मुंडे यांच्या जागी ओबीसी समाजातूनच येणाऱ्या रमेश कराड यांच्या नावाची अचानक घोषणा करण्यात आली. त्यानंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातही प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा सुरू असताना त्यांच्या जागी ओबीसी समाजातीलच भागवत कराड यांना संधी देण्यात आली. या घटनांमुळे भाजपच्या नेतृत्त्वाकडून मुंडे भगिणींना जाणीवपूर्ण डावलण्यात येत आहेअसा आरोप मुंडे समर्थकांकडून केला जात आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे पदाधिकारी आता राजीनामा देऊ लागले आहेत.

दरम्यान, आगामी काळात हे प्रकरण कसं वळण घेतं आणि भाजप नेतृत्वाकडून या नाराज पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का, याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या