Ticker

6/Breaking/ticker-posts

मराठा आरक्षण: ‘ मराठा आरक्षणासाठी आता केंद्राने निर्णय घ्यावा

 *घटना दुरुस्तीनंतर आरक्षण देण्याचे अधिकार केंद्राकडेच.

*केंद्राची याचिका फेटाळल्यानंतर अशोक चव्हाण बोलले.

लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 मुंबई: संसदेच्या १०२ व्या घटना दुरुस्तीबाबत केंद्र सरकारची पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने मराठा आरक्षण प्रश्नी न्यायालयीन लढ्याला मोठा धक्का बसला आहे. या घटना दुरुस्ती नंतर आरक्षण देण्याचे अधिकार राज्यांकडे नव्हे तर केंद्राकडे आहेत, हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयातून अधोरेखित झाले. त्यामुळे आता केंद्राने घटना दुरुस्ती करून राज्यांना आरक्षणाचे अधिकार पुन्हा बहाल करणे तसेच आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करणे आवश्यक झाले आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

ही राजकारण करण्याची वेळ नाहीतर सर्व राजकीय पक्षांनी एकत्रितपणे बाजू मांडून केंद्र सरकारच्या माध्यमातून घटना दुरुस्ती केली पाहिजे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावाअशी आमची मागणी आहेमराठा आरक्षणावर विरोधकांनी कितीही राजकारण केले असले तरी आम्ही या विषयावर राजकारण करणार नाही. पुनर्विलोकन याचिका करताना केंद्र सरकार कमी पडले, असा राजकीय आरोप आम्ही करणार नाही. , असेही अशोक चव्हाण यांनी पुढे नमूद केले.

 ५ मे रोजी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने बहुमतानेसामाजिक आणि आर्थिक मागासवर्ग ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला असल्याचे स्पष्ट केले होते. मराठा आरक्षणावर १०२ व्या घटनादुरुस्तीने राज्यांना असलेला हा अधिकार उरला नसल्याचेही घटनापीठाने नमूद केले होते. त्यावर केंद्र सरकारने फेरविचार याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळताना सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निष्कर्ष नोंदवले आहेत. 

न्या. अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठात या याचिकेवर सुनावणी झाली. त्यात 'फेरविचार याचिका ज्या आधारावर दाखल करण्यात आली आहे तिचा मर्यादित विचार करता येणार नाही,' असे न्या. भूषण यांनी नमूद केले. ज्या आधारांवर याचिका दाखल करण्यात आली आहे तिचा विचार मुख्य निकालात करण्यात आला आहे. त्यामुळे या फेरविचार याचिकेची दखल घेण्यासाठी पुरेसा आधार नाही, असे मत अन्य चार न्यायमूर्तींनी नोंदवले. त्यानंतर खंडपीठाने ही याचिका फेटाळली. यासोबतच यावर खुली सुनावणी घेण्याची विनंती करणारी केंद्र सरकारची याचिकाही खंडपीठाने फेटाळून लावली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या