Ticker

6/Breaking/ticker-posts

'आषाढी'वारीला वारकरी कमी पोलिस जास्त ; पंढरीत केवळ ४०० वारकऱ्यांसाठी २३०० पोलिसांचा फौजफाटा !

 

*पंढरपुरात आषाढी यात्रेवर यंदाही करोनाचे सावट.
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

पंढरपुर: दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरपुरात आषाढीच्या सोहळ्यात एकादशी दिवशी पहाटे श्री विठ्ठल मंदिरात पूजेसाठी उपस्थित राहणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्यासमवेत येणाऱ्या अन्य व्हीआयपी व्यक्ती वगळता धार्मिक विधी पार पाडणाऱ्या पुजाऱ्यांसोबतच इतर सर्व वारकऱ्यांना आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे.

आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात होणारी गर्दी लक्षात घेता करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शनिवार दुपारी दोन वाजल्यापासून ते २५ जुलै रोजीच्या सायंकाळी चार वाजेपर्यंत पंढरपूर शहर व गोपाळपूर परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर आषाढी वारी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस व आरोग्य विभाग सज्ज झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सलग दुसऱ्या वर्षी पंढरपूर आषाढी वारीवर करोनाचे सावट आहे. यंदाही मर्यादित स्वरूपातच आषाढीचा सोहळा साजरा करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्यानुसार प्रशासनाने तयारी केली असून केवळ चारशे वारकऱ्यांना परवानगी दिली आहे. परवानगी दिलेल्या वारकऱ्यांशिवाय इतर कोणालाही पंढरीत प्रवेश करण्यास व चंद्रभागा नदीत स्नान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मानाच्या १० पालख्यांनाच परवानगी दिली असून या सर्व पालख्या १९ जुलै रोजी वाखरी येथे दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल होणार आहेत. याठिकाणी सर्व संतांच्या भेटी होऊन सर्व पालखी सोहळे पंढरपूरकडे प्रस्थान करतील. यावेळी प्रतीकात्मक पायी वारी सोहळा होणार असून वाखरी ते इसबावी येथील विसावा मंदिर हे तीन किलोमीटरचे अंतर सर्व मानाच्या पालख्यांचे ४० वारकरी पायी पूर्ण करतील तर इसबावी ते पंढरपूर या दरम्यान २० वारकऱ्यांच्या उपस्थितीतच पायी वारी होणार आहे. इतर ३८० वारकऱ्यांना मात्र बसमधूनच पंढरपूरमधील आपापल्या मठाच्या ठिकाणी रवाना व्हावे लागणार आहे.

आषाढी एकादशी दिवशी (२० जुलै, मंगळवार) पहाटे २.२० ते ३.२० या वेळेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठ्ल- रुक्मिणी यांची शासकीय पूजा होणार असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे उपस्थित होते.संचारबंदीमुळेच मोठा फौजफाटा

पंढरपूर आषाढी वारी साठी केवळ चारशे वारकऱ्यांनाच परवानगी दिलेली असताना बंदोबस्तासाठी मात्र २ हजार ३०० पोलिसांची फौज तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना विचारले असता त्यांनी, १४४ कलमानुसार संचारबंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूर शहराबरोबरच नदीपात्र व घाट परिसरात मोठ्या संख्येने पोलिसांची गरज असून हा बंदोबस्त वारकऱ्यांसाठी नाही तर संचारबंदीच्या अंमलबजावणीसाठी असल्याचे स्पष्टीकरण दिले. करोना प्रतिबंधक लसचे दोन्ही डोस घेतलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचीच बंदोबस्तासाठी नियुक्ती केली असल्याचेही सातपुते यांनी सांगितले. पंढरपूर शहर व गोपाळपूर वगळता भटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी आदी गावांमध्ये मात्र १८ ते २२ जुलैपर्यंत संचारबंदी राहणार आहे. सुरुवातीला एक दिवस आणि नंतर दोन दिवस असे एकूण तीन दिवस या गावांना संचारबंदीतून वगळण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.

आरोग्य यंत्रणाही सज्ज

पंढरपुरातील आषाढी वारीच्या निमित्ताने येणारे वारकरी, भाविकांना रोगराईपासून दूर ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मदतीने १० तात्पुरते दवाखाने उभारण्यात आले असून त्याठिकाणी शंभर बेडची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यात ५० कोविड तर ५० नॉनकोविड बेडचा समावेश आहे. त्यासोबतच सात रुग्णवाहिकाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या