Ticker

6/Breaking/ticker-posts

कोपर्डीतील घटनेला ५ वर्षे पूर्ण; ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहुन केली 'ही' मागणी

 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 कर्जत: तालुक्यातील कोपर्डी येथील शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेला आज पाच वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त ग्रामस्थांनी एकत्र येत तिला श्रद्धांजली अर्पण केली. यासंबंधीचा खटला उच्च न्यायालयात प्रलंबित असून लवकरात लवकर तो चालवून आरोपींना शिक्षा व्हावी, अशी मागणी यावेळी त्या मुलीचे पालक आणि ग्रामस्थांनी केली.


कोपर्डीमध्ये १३ जुलै २०१७ रोजी ही घटना घडली होती. आजोबांच्या घरी भाजी करण्यासाठी मसाला आणण्यासाठी गेलेल्या मुलीला आरोपींनी रस्त्यात अडवून तिच्यावर अत्याचार केला आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला. ही घटना तेव्हा राज्यभर चर्चेत होती. अहमदनगरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात काही वर्षांपूर्वीच या खटल्याचा निकाल लागला आहे. न्यायालयाने आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर हा खटला मुंबई उच्च न्यायालयात गेला आहे. तेथे तो अद्याप प्रलंबित आहे. या घटनेला पाच वर्षे झाल्याच्या निमित्ताने कोपर्डीतील ग्रामस्थांनी या मुलीला श्रद्धांजली अर्पण केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मुलीच्या आईने सांगितले की, पाच वर्षे झाल्यानंतरही आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला नाही. आधीचे सरकार आणि आताचे सरकार दोघांनीही केवळ आश्वासनेच दिली आहेत. आता आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे की हा खटला उच्च न्यायालयातही जलद गतीने चालवून आरोपींना लवकर शिक्षा होईल, याकडे लक्ष द्यावे. आम्ही आमची मुलगी गमावली आहे. मात्र, आरोपी शिक्षा होऊनही अद्याप जिवंत आहेत. जिल्हा न्यायालयात अवघ्या १६ महिन्यांत निकाल लागला. उच्च न्यायालयात हा खटला का रेंगाळला हे आम्हाला कळत नाही. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार,’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान राज्यभरात अनेक ठिकाणी पीडीत मुलीला विविध संघटनांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उच्च न्यायालयात खटला रखडल्याबद्दल संतप्त भावना व्यक्त करून सरकारने यामध्ये लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या