Ticker

6/Breaking/ticker-posts

आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने लवकरच होणार मायंबा ते मढी राज्यातील देवस्थानचा पहिला रोप-वे

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

 मायंबा: देशातील नाथभक्तांच्या सोयीसाठी मायंबा व मढी देवस्थान समितीकडून संयुक्त उपक्रम हाती घेण्यात येत असून सुमारे ४५ कोटी रुपये खर्चून दोन्ही देवस्थानांना जोडणारा रोप-वे केला जाणार आहे. हा राज्यातील एकमेव असा उपक्रम ठरणार आहे.


मदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने दोन्ही देवस्थान समित्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मायंबा देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, मढी देवस्थान समितीचे अध्यक्ष संजय मरकड, कोषाध्यक्ष बबन मरकड, शिवजीत डोके, विलास मढीकर ,भानूविलास मरकड  सावरगावचे सरपंच राजेद्र म्हस्के आदी संयुक्त बैठकीला उपस्थित होते.

 

गर्भगिरी डोंगर रांगांमध्ये श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे नाथ संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली गेली. येथून जवळच नाथ संप्रदायाचे आद्य मच्छिंद्रनाथांची संजीवनी समाधी मायंबा ( सावरगाव) येथे आहे. तेथून जवळच चैतन्य कानिफनाथाची मढी येथे संजीवन समाधी आहे. संपूर्ण परिसरात औषधी वनस्पती मुळे अत्यंत शुद्ध हवामान असते. पावसाळ्यामध्ये तर या परिसरात राज्याच्या विविध भागातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. दोन्ही देवस्थान समिती यांच्यातर्फे भाविकांना मोफत महाप्रसाद दिला जातो. मढी- मायंबा- वृद्धेश्वर अशी भ्रमंती एका दिवसात पूर्ण होते. मायंबा देवस्थानची उंची जास्त असून अत्यंत अवघड असा रस्ता आहे. अलीकडील काही वर्षात सर्व देवस्थाने डांबरी रस्त्याने जोडली गेली तरी सोयीस्कर दळणवळण व्यवस्था नसल्याने अनेक भाविक मढी वरून दहा किलोमीटरचा घाट रस्ता पायी चालत मायंबाला जातात. धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनाला असलेला प्रचंड वाव व यातून संपूर्ण परिसराचा होणार सर्वांगीण विकास डोळ्यापुढे ठेवून दोन्ही देवस्थान समित्यांनी संयुक्त विकास कामांचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या विविध योजनांची मदत घेऊन रोप-वे चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यावर सर्वांनी शिक्कामोर्तब केले.

 

वणी, गिरणार पर्वत आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या रोप-वेच्या सुविधेचा चर्चेतून आढावा घेण्यात आला. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठीचे प्रस्ताव सादर करून या माध्यमातून संपूर्ण गर्भगिरी डोंगर रागाच्या परिसर निसर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून हाती घेऊन वृक्षारोपणाने या उपक्रमाचा प्रारंभ झाला. मायंबा समाधी मंदिर परिसरात व डोंगररांगांमधून वड, पिंपळ, लिंब आधी प्रकारची ४४ हजार झाडे लावण्यासाठी देवस्थान समितीने यंत्रणा सज्ज केली आहे. मढी देवस्थान व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण मोहीम हाती घेतली जाणार आहे. पुढील महिन्यात यासाठी पुन्हा बैठक आयोजित केली जाणार आहे.

 

“मायंबा- मढी देवस्थान दरम्यान रोप-वे चे काम पूर्ण झाल्यावर आष्टी तालुक्यातील डोंगराळ व दुर्गम भागाचे आर्थिक संबंध पाथर्डी , तिसगाव गावांबरोबर वाढतील. उपेक्षित गावे विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन नगर तालुक्यातील आगडगाव, महाल, करंजी घाट, वृद्धेश्वर ,मढी, मायंबा, तारकेश्वर , मोहटादेवी पासून येवलवाडी येथील जालिंदरनाथांची समाधी स्थानापर्यंत पर्यटन वाढणार आहे.”- संजय मरकड (अध्यक्ष मढी देवस्थान) 

 

“आमदार सुरेश धस यांच्या पुढाकाराने सुरू असलेली विकास कामे मायंबा व परिसरात लक्षणीय ठरली आहेत. मूळ स्वरूपाला कुठेही धक्का न लागू देता परिसराचा सर्वांगीण विकास हाती घेताना, मढी देवस्थान समितीचे सहकार्य लाभणार असल्याने विकासाचा वेग वाढेल कोठेही बाजारू स्वरूप परिसराला येणार नाही. याची काळजी घेऊ”  -दादासाहेब चितळे (अध्यक्ष- मायंबा देवस्थान)

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या