Ticker

6/Breaking/ticker-posts

‘कर्जत-जामखेडमध्ये सर्वांची बॅटिंग मी पाहिली आहे, सगळी मॅच फिक्सिंग..!’ - आ.पवार








 लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

कर्जत:  कर्जत-जामखेड मतदारसंघातील एकमेकांचे राजकीय  विरोधक असलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार  भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे  दोघेही  एका कार्यक्रमात एका व्यासपीठावर येता येता राहिले. त्यांच्यातील सामना थोडक्यात हुकला . पवारांना उशीर झाल्याने शिंदे आधीच जोरदार बॅटिंग  करून निघून गेले. त्यानंतर आलेल्या पवारांनी मग काय चौफेर फटकेबाजी केली. कर्जत-जामखेड तालुक्यातील सर्वांची बॅटिंग मी पाहिली आहे. येथे जसे फिल्डिंग करणारे आहेत तसे  मॅच फिक्सिंग करणारेही आहेत,’ या त्यांच्या वाक्यावर हशा पिकला .

कर्जत शहरात नव्याने सुरू झालेल्या एका कृषी विषयक मॉलचे उद्घाटन झाले. यासाठी आमदार पवार व माजी मंत्री शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले होते. पवार व शिंदे प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार असल्याने कोण काय बोलणार, यासंबंधी नागरिकांमध्ये उत्सुकता होती. प्रत्यक्षात मात्र दोघे एकत्र आलेच नाहीत. पवार येण्यापूर्वीच शिंदे भाषण करून निघून गेले. शिंदे यांनी कोणतेही राजकीय भाष्य टाळून केवळ शुभेच्छापर भाषण केले. त्यानंतर आलेल्या पवार यांनी मात्र चांगलीच फटकेबाजी केली.

ते म्हणाले, ‘आजच्या कार्यक्रमात व्यवसाय, खेळ, राजकारण व धार्मिक या सर्व विषयांवर भाषणे झाली. मलाही क्रिकेट खूप आवडते आणि मी क्रिकेट खेळतो देखील. कर्जत-जामखेडमधील सर्वांच्या बॅटिंग मी पाहिल्या आहेत. येथे बॅटिंग करणारे आहेत, फिल्डिंग करणारे आहे. तसेच सर्व ठिकाणी मॅचफिक्सिंग करणारे देखील आहेत.त्यांच्या या विधानाला उपस्थितांकडून चांगलीच दाद मिळाली. काहींकडून त्याचा राजकीय अर्थही काढला जाऊ लागला आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात आतापर्यंत पवार-शिंदे एकाच व्यासपीठावर आलेले नाहीत. या उद्घाटनासाठी दोघेही एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे नागरिकांची उत्सुकता वाढली होती. यामुळे कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. अखेर उपस्थितांची दोघांना एकाच व्यासपीठावर पाहण्याची संधी हुकली. परंतु रोहित पवार यांनी या कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी करण्याची संधी सोडली नाही. त्यांच्या या भाषणाची आता मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या