Ticker

6/Breaking/ticker-posts

शिवसेनेचा मनसेला ‘जोर का धक्का..धिरसे’ ; 'हा' प्रमुख नेता अडकला शिवबंधनात

 

*मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर शिवसेनेत.

*उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांच्या हातावर बांधले शिवबंधन.
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीला अजून विलंब असला तरी सर्वच पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली असून मुंबईतील मनसेचा महत्त्वाचा नेता आज शिवसेनेत परतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना अध्यक्ष आणि मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य शिरोडकर यांच्या हातावर शिवबंधन बांधत त्यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे युवा सेना सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते.


आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून पक्षात इनकमिंगही वाढले आहे. त्यात आदित्य शिरोडकर यांच्यासारखा मनसेचा तगडा युवा नेता शिवसेनेत आल्याने त्याचा मोठा फायदा सेनेला होण्याची शक्यता आहे. भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना असा प्रवास करणारे आदित्य शिरोडकर हे मनसेतही विद्यार्थी विंगमध्ये सुरुवातीपासून सक्रिय होते. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद राज यांनी त्यांना दिलं होतं. अर्थात आदित्य यांचे वडील राजन शिरोडकर हे राज यांचे जवळचे मित्र असल्याने त्या नात्यानेही आदित्य हे राज यांचे निकटवर्तीय राहिले.

मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये आदित्य शिरोडकर यांच्याकडे उच्च शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत आदित्य यांना मनसेने उमेदवारी दिली होती. तेव्हा आदित्य यांच्या पारड्यात ७३ हजार मते पडली होती. दरम्यान, आदित्य शिरोडकर आणि बाळा नांदगावकर यांच्यात गेल्यावर्षी मनसे अधिवेशनादरम्यान वाद झाल्याच्या चर्चा होत्या. त्यात मनसे विद्यार्थी सेनेतही धुसफूस वाढली असल्याचे बोलले जात होते. या सर्व पार्श्वभूमीवर आदित्य यांनी मनसेला रामराम ठोकल्याने मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

शिवसेना महापालिका निवडणुकीसाठी मुंबईत लोकसभा मतदारसंघनिहाय व्यूहरचना आखत असून त्यात आदित्य यांच्याकडे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी एक ट्वीट करत आदित्य यांचे स्वागत केले आहे. 'आदित्य शिरोडकर यांचे शिवसेना परिवारात स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!', असे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केले आहे. या घडामोडीवर मनसेतून पहिली प्रतिक्रिया अभिजीत पानसे यांनी दिली असून 'महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं ग्रहण सुटलं' असं विधान त्यांनी केलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या