Ticker

6/Breaking/ticker-posts

शरद पवारांची 'सह्याद्री'वर बैठक; सरकारला केली 'ही' महत्त्वाची सूचना

 *फलोत्पादन वाढीसाठी शरद पवार यांच्या सूचना.

*सकारात्मक निर्णय घेण्याची अजित पवारांची ग्वाही.
लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 मुंबई: महाराष्ट्रातील फलोत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेतील उत्कृष्ट वाण उपलब्ध करणे, राज्यातील फलोत्पादन वाढीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचं वैशिष्ट्यपूर्ण फळपिक विकसित करून त्याचं ब्रॅन्डिंग करणे, वसंतदादा शुगर इन्स्ट्यिट्युटच्या धर्तीवर फळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था उभी करून प्रत्येक जिल्ह्यात फळनिहाय शाखा निर्माण करणे याबाबत ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांवर राज्य शासन सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात 'महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा' या विषयावर आज बैठक झाली. या बैठकीला कृषीमंत्री दादा भुसे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, पोक्राच्या प्रकल्प संचालक इंद्रा मालो, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्सचे विलास शिंदे आदींसह राज्यातील फलोत्पादन, कृषी निर्यात क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याच्या कृषी, फलोत्पादन विभागातर्फे राज्यातील फलोत्पादनाबाबत सादरीकरण करण्यात आले.

महाराष्ट्रात फलोत्पादन वाढीला व फळनिर्यातीला प्रचंड संधी आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र फळपिक जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणून विकसित करता येईल. फलोत्पादन व उत्पन्न वाढीसाठी जागतिक स्तरावरील उत्कृष्ट वाण शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. फळांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ब्रॅन्डिंग निर्माण करण्यासाठीफळप्रक्रिया उद्योग उभारण्यास शासनाने मदत करावी. फळ निर्यातदारांची फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणा कार्यक्षम करावी, आदी सूचना शरद पवार यांनी यावेळी केल्या. त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल व त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

राज्यातील फळे व भाजीपाला निर्यातक्षम होण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न सुरू असून अॅळपेडामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. राज्यातील फलोत्पादन क्षेत्र वाढवताना फळांना जिल्हानिहाय भौगोलिक मानांकन देण्यासाठी त्याचबरोबर ॲव्हाकॅडोसारख्या नवीन फळांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. यावर्षी आजमितीस राज्यात ८० टक्के पेरणी पूर्ण झाली असून ३९ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड करण्यात आली आहे. यंदा सोयाबीनच्या घरगुती बियाण्यांचा वापर प्रभावीपणे झाल्याचे व गतवर्षीपेक्षा १०५ टक्के सोयाबीनची पेरणी पूर्ण झाल्याची माहिती कृषीमंत्री भुसे यांनी दिली.

ही फळे जागतिक ब्रँड बनली पाहिजेत

जगात केळ्यांसाठी अमेरिकेतील चिकिता, सफरचंदांसाठी वॉशिंग्टन, किवीसाठी झेस्प्री हे ब्रॅंड प्रसिद्ध असून त्यांची कित्येक कोटींची उलाढाल आहे. महाराष्ट्रातील द्राक्षे, केळी, संत्री, हापूस आंबा, डाळींब ह्या फळांनाही जागतिक ब्रॅंड बनवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. आधुनिक संशोधन व परदेशातून दर्जेदार वाण आयात केल्यास याद्वारे आपल्या राज्यातील फळं आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता येतील. मूल्यसाखळी, विमा संरक्षण, निर्यात प्रोत्साहन, उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन आणि व्यावसायिक दृष्टीकोन विकसित करून हे साध्य करता येईल, असे शरद पवार यांनी या बैठकीत सांगितले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या