लोकनेता न्यूज
(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)
मुंबई: शरद
पवार देशाचे राष्ट्रपती होणार या
बातम्या निराधार आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. या बातम्या पेरण्यात आल्या आहेत, असे नमूद करत राष्ट्रवादी काँग्रेसचे
राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री
नवाब मलिक यांनी याबाबतच्या चर्चांना
पूर्णविराम दिला आहे.
शरद पवार हे राष्ट्रपती होणार असून त्यासाठी
मोर्चेबांधणी सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यावर आज नवाब मलिक यांनी
पक्षाची भूमिका स्पष्ट केली व याबाबतची शक्यता फेटाळून लावली. ' सध्या राष्ट्रपतीपदाची निवडणूक नाही.
येत्या काळात पाच राज्यांच्या निवडणुका असून त्या निकालानंतरची काय परिस्थिती असेल
त्यावर पुढच्या बाबी स्पष्ट होणार आहेत. मात्र, राष्ट्रवादी
पक्षांतर्गत राष्ट्रपतीपदाबाबत कधीही चर्चा झाली नाही किंवा इतर पक्षांसोबतही
त्यावर पक्षाने वा शरद पवार यांनी चर्चा केलेली नाही. त्यामुळे या बातम्यांमध्ये तथ्य
नाही', असे नवाब मलिक यांनी नमूद केले.
प्रशांत किशोर यांची मोर्चेबांधणी
शरद पवार हे युपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असू
शकतात अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.
यासाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर हे व्यूहरचना आखत आहेत. त्याचाच भाग
म्हणून त्यांनी शरद पवार यांची आधी मुंबई आणि नंतर दिल्लीतील निवासस्थानी भेट
घेतली. त्यापाठोपाठ ते काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनाही ते
भेटले. सर्व विरोधी पक्षांचं पवार यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यताही
वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र यात काहीही
तथ्य नसल्याचे म्हणत तूर्त चर्चांना ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढील वर्षी
होणार निवडणूक
पुढील वर्षी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होणार आहे.
विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ जुलै २०२२ पर्यंत आहे. त्याआधी उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि
मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या
पार्श्वभूमीवर या निवडणुकांचे निकाल अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
0 टिप्पण्या