Ticker

6/Breaking/ticker-posts

नगरचा करोना वाढतोय.. तरी गर्दी कायम.. यात्रा अन जत्राही हाऊसफुल्ल..!

 

* जिल्ह्यात करोना वाढत असतानाही आज नेवासा तालुक्यातील वरखेड येथे भरली भरगच्च यात्रा.

*अंधश्रद्धा निमूर्लन समितीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर गर्दी हटविण्यात आली.






लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 नेवासा: अहमदनगर जिल्ह्यात एका बाजूला करोनाच्या नव्या रुग्णांचे आकडे वाढत असताना दुसरीकडे नागरिक आणि प्रशासनाचा बेफिकीर कारभार सुरूच आहे. काल शेवगावमधील मोठ्या गर्दीचा विवाह समारंभ पुढे आला. आज नेवासा तालुक्यातील वरखेड येथील भरगच्च यात्रा भरल्याचे उघडकीस आले आहे. मुख्य म्हणजे यात्रेचा आज नववा दिवस होता. अंधश्रद्धा निमूर्लन समितीने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यावर गर्दी हटविण्यात आली.

करोनामुळे सध्या राज्यातील मंदिरे बंद आहेत. त्यामुळे सहाजिकच यात्रा-जत्रा आणि उत्सवही बंद आहेत. असे असले तरी नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वरखेड गावची यात्रा मात्र मोठ्या गर्दीत भरलीच. गावातील लक्ष्मीआईची ही यात्रा आषाढ महिन्यात भरते. ‌आषाढ महिन्यात ‌दर‌ शुक्रवार, रविवार, ‌मंगळवारी ही यात्रा भरते. म्हणजेच ‌यात्रेचा आज ९ वा दिवस होता. यात्रेच्या दिवशी हजारोंच्या ‌संख्येने‌ लोक उपस्थित असतात. शुक्रवारीही मोठ्या संख्येने भाविक आले होते. या यात्रेवर अंनिसचे गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या अर्थाने लक्ष आहे. या यात्रेत पशुहत्या केली जाते. ती बंद करण्यासाठी अंनिसचे प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी चार ते पाच हजार बोकडांचा बळी येथे दिला जातो. मोठ्या प्रमाणात दारूचीही विक्री होते. अंनिसच्या राज्य सचिव अड. रंजना गवांदे, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबा अरगडे, प्रमोद भारुळे, अर्जुन हरेल, विनायक सापा, सुरेश हुंगारे, विजय शिरसाठ हे यासाठी गेली पाच वर्षे पाठपुरावा करीत आहेत.

करोनामुळे ही यात्रा भरणार नाही, असे वाटत होते. मात्र, जेव्हा अंनिसच्या कार्यकर्त्यांनी भेट दिली, तेव्हा मोठ्या गर्दीत ही यात्रा भरल्याचे आढळून आले. त्यावर अड. गवांदे यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना संपर्क करून याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने तेथे वाहतूक पोलिस आले. त्यांनी गर्दी नियंत्रणाचा प्रयत्न केला. मात्र, बंदी असतानाही यात्रा भरली कशी, असा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर तहसीलदार आणि अन्य अधिकारी तेथे आले.

अंनिसने पुढाकार घेतल्याने दुपारनंतर गर्दी हटविण्यात आली असली तरी गेली नऊ दिवस येथे यात्रा भरतच होती. दूरवरून भाविक दर्शनासाठी येत होते. दुकाने थाटली होती. वाहनांमधून दाटीवाटीने भाविक प्रवास करीत होते. करोनाच्या काळात गर्दी आणि संपर्क टाळणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष करून हे प्रकार सुरूच होते, असे यावरून दिसून येते. उल्लेखनीय म्हणजे नेवासा तालुक्यातील रुग्णांची संख्याही मोठी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या