Ticker

6/Breaking/ticker-posts

‘ तसं काही या नव्या सहकार मंत्रालयाकडून होऊ नये’ : सरकारमधील मंत्र्याने व्यक्त केली 'ही' भीती

 


लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर: केंद्र सरकारने नव्याने निर्माण केलेल्या सहकार खात्याचा हेतु आम्हाला अद्याप समजलेला नाही. त्यामुळे त्यावर आताच काही बोलता येणार नाही. मात्र, काही काळापूर्वी आणखी एक कायदा केंद्र सरकारने केला आहे. त्यानुसार सहकारी बँका थेट रिझर्व बँकेच्या अखत्यारित येणार असून संचालकांना फारसे अधिकार राहणार नाहीत. तसं काही या नव्या सहकार मंत्रालयाकडून होऊ नये,’ अशी भीती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  यांनी व्यक्त केली.

केंद्रात सहकार खाते निर्माण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या खात्याची धुरा अमित शहा यांच्याकडे सोपवली आहे. त्याअनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न विचारला असता थोरात म्हणाले, ‘केंद्र सरकारने नव्याने सहकार मंत्रालय सुरू केले. त्यासाठी ज्येष्ठ मंत्र्यांची नियुक्ती केली. मात्र, या खात्याचा हेतु अद्याप आम्हाला कळलेला नाही. पण येथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की मध्यतंरी केंद्र सरकारने एक कायदा केला. त्यानुसार आपल्याकडील अर्बन आणि सर्वच सहकारी बँकांवर रिझर्व बँकेचे नियंत्रण येणार आहे. हे नियंत्रणही मर्यादेपलीकडील आहे. या बँकांचे अध्यक्षही संचालकांतून नव्हे तर रिर्झव बँकेच्या मान्यतेने नियुक्त केले जाणार आहेत. कार्यकारी संचालकही रिर्झव बँकेकडूनच येणार. संचालकांचे अधिकारही कमी करून टाकले आहेत. हे सहकाराच्या तत्वाला धरून नाही. जर सहकारात काही चुकत असेल तर संबंधितांना शिक्षा जरूर केली पाहिजे. मात्र, सहकाराचे जे तत्व आहे, सहकाराचा जो प्राण आहे, तो तर टिकला पाहिजे. दुर्दैवाने त्या कायद्यामध्ये असे होताना दिसत नाही. आता नव्या सहकार खात्याकडून असे काही न होता, सहकार बळकट करण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा आहे.'

राज्य सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकाबद्दल विचारले असता थोरात म्हणाले, ‘केंद्रीय कृषी कायद्यात ज्या त्रुटी राहिल्या आहेत, जे संभाव्य धोके आहेत, ते टाळून सुधारणा करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने या विधेयकात केला आहे. शेतकऱ्यांना पूर्णपणे संरक्षण कसे मिळेल, त्रुटी राहून त्याचा गैरफायदा घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. याचा विचार यात करण्यात आलेला आहे.'

भाजपने देशाची माफी मागावी

केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करताना थोरात म्हणाले, ‘गेल्या सात वर्षांत भाजपच्या सत्ता काळात देशासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले. सामान्यांचे जीवन जगणे कठीण झाले. सरकारची सगळी धोरणे चूकत गेली. त्यामुळे महागाई, बेरोजगारी वाढली. तेव्हा इंधनाचे दर काही पैशांत जरी वाढले तरी भाजपचे नेते आक्रमक होऊन आंदोलने करीत. आता भरमसाठ दरवाढ होत असूनही ते देशाची दिशाभूल करणारी विधाने करीत आहेत. त्यामुळे त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे. त्यांचा हा फोलपणा उघड करण्यासाठी काँग्रेसतर्फे आंदोलन हाती घेण्यात आले आहे.' यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, दीप चव्हाण, खलील शेख उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या