Ticker

6/Breaking/ticker-posts

आठवलेंची शिवसेनेला पुन्हा युतीसाठी साद ; बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर..









लोकनेता  न्यूज

(ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

पुणे: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीसाठी आग्रह धरला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर शिवसेनेने भाजपसोबत यायला हवे. अजूनही वेळ गेलेली नाही, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.

रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले हे सातत्याने शिवसेना भाजप युतीसाठी आग्रही राहिले आहेत. या दोन पक्षांचा काडीमोड होऊ नये म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाला साद घातली होती. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युलाही त्यांनी दोन्ही पक्षांपुढे ठेवला होता. आज पुणे येथे पत्रकारांशी बोलताना आठवले यांनी पुन्हा एकदा तोच सूर आळवला. यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावरही निशाणा साधला.

' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार टिकून आहे; पण या सरकारमध्ये ताळमेळ राहिलेला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रोज कोणावर ना कोणावर आरोप करत‌ आहेत. त्यांना भवितव्य दिसत नाही. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर शिवसेनेने

भाजप सोबत यावे. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला अमलात आणायचा असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही', असे आठवले म्हणाले. शिवसेनेने स्वत:चे नुकसान थांबवले पाहिजे, असे नमूद करताना यात भाजपचेही नुकसान होऊ शकेल, असे आठवले यांनी सांगितले. भाजप आणि रिपब्लिकन पक्ष एकत्र राहिले तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता येणार नाही, असा दावाही आठवले यांनी केला.

मी सर्वप्रथम 'करोना गो' चा नारा दिला होता, असे सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना परिस्थितीचा सामना यशस्वीपणे केला. रोज सव्वा चार लाख करोना बाधित समोर येत होते. नकारात्मक चर्चा होऊ लागली होती; पण मोदींनी चांगली यंत्रणा निर्माण केली. आता तिसरी लाट आली तर सक्षम यंत्रणा उभी आहे. राज्यांना मदत करण्यात आली आहे, असे आठवले म्हणाले. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहेत; पण त्यांनी पदापेक्षा पक्षासाठी काम करावे. त्या भाजपमध्येच राहतील, असे एका प्रश्नाच्या उत्तरात आठवले म्हणाले. पुणे महापालिकेने करोनाचा यशस्वीपणे सामना केला. शहरात खाटा, ऑक्सिजन, औषधे यांचा तुटवडा निर्माण झाला नाही, अशा शब्दांत त्यांनी महापालिकेचे कौतुक केले.

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या