Ticker

6/Breaking/ticker-posts

पडळकराना धनगर समाजातूनच विरोध; 'या' संघटनेनं केली घणाघाती टीका

 *नगरमध्ये धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या

 'जय मल्हार' संघटनेनं केली जहरी टीका








लोकनेता  न्यूज

(  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 अहमदनगर:भडक वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना आता अंतर्विरोध वाढत चालला आहे. धनगर आरक्षणासाठी लढा देत असलेल्या 'जय मल्हार' सेनेने त्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. बिरोबाची शपथ घेऊन भाजपला मतदान करू नका म्हणणारे पडळकर स्वार्थासाठी स्वत:च भाजपमध्ये गेले आहेत. राजकारणासाठी ते पुढे काहीही करू शकतात,’ अशी टीका जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी केली आहे.


गोपीचंद पडळकर हे गेल्या काही दिवसांपासून स्वत:ला धनगर समाजाचे नेते म्हणून प्रस्थापित करू पाहात आहेत. मात्र धनगर आरक्षणासाठी लढा देणाऱ्या संघटनेनंच पडळकर यांच्यावर आता निशाणा साधला आहे.

धनगर आरक्षणासाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी शेवाळे यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधण्यात आला. पडळकर यांच्याबद्दल बोलताना शेवाळे म्हणाले, ‘पडळकर राजकारणासाठी काहीही करू शकतात. त्यांनी एकदा समाजाच्या मेळाव्यात बिरोबाची शपथ घेऊन भाजपला मतदान करू नका असे सांगितले होते. आता त्यांनीच ती शपथ विसरून म्हणजे बिरोबालाही बाजूला सारून स्वार्थी राजकारणासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातून त्यांना आमदारकी मिळाली. त्यांना यापुढे जे पाहिजे असेल त्यासाठी ते काहीही करू शकतात. समाजाच्या प्रश्नापेक्षा ते राजकारणच जास्त करतात,’ अशी टीका शेवाळे यांनी केली.

धनगर आरक्षणाच्या प्रश्नासंबंधी शेवाळे म्हणाले, ‘धनगरांच्या आरक्षण संदर्भात येत्या आठ दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. त्या चर्चेत काय होते ते पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार आहे. राज्य सरकारमध्ये सध्या धनगर समाजाच्या आरक्षणाची चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. आता महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यासाठी मंत्रालयामध्ये बैठक लावण्यासाठी थोरात यांनी पुढकार घेतला आहे.

'आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका'


' धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत तत्परतेने पावले उचलावीत. येत्या  काळात आम्हाला रस्त्यावर उतरायला भाग पाडू नका. किमान धनगर समाजाच्या प्रश्नावर चर्चा करून त्याला गती तरी द्या, एवढीच मागणी आम्ही जय मल्हार सेनेच्या वतीने सरकारकडे करत आहोत. येत्या चार महिन्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये धनगर समाजाची ज्या गावात वस्ती त्या गावांमध्ये जय मल्हार सेनेची शाखा उघडण्यात येणार आहे. 

सध्या करोनाची परिस्थिती असल्यामुळे धनगर समाज सध्या शांत आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी ज्या प्रकारे प्रयत्न सुरू केले आहेत, त्याचप्रमाणे धनगरांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करावेत अन्यथा आंदोलन अटळ आहे,’ असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, यावेळी जिल्हाध्यक्ष प्रदीपराज भोंडे, दत्तात्रय वीर, राजेंद्र शिंदे, गणेश शिंदे, अशोक काळे, अरुण कर्डीले, शंकर भाकरे, आसाराम कर्डीले उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या