Ticker

6/Breaking/ticker-posts

कामावरुन काढल्याचा राग; ट्रकचालकाने थेट पेटविले ऑफिस, कंपनीच्या गाड्याही फोडल्या

 


लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

नगरः ट्रान्सपोर्ट कंपनीने कामावरून काढून टाकल्याच्या रागातून एका ट्रकचालकाने चांगलीच दहशत निर्माण केली. ज्या सिमेंट कंपनीच्या तक्रारीवरून त्याला काढून टाकण्यात आले, त्या कंपनीचे केडगावमधील कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तर ज्या ट्रान्सपोर्ट कंपनीने कामावून काढून टाकले, त्यांच्या गाड्या रस्त्यावर अडवून, काचा फोडून चालकांना दमबाजी केली. शेवटी पोलिसांनी त्याला अटक केली.

 

भिमा सर्जेराव सकट (वय ३२ वर्षे रा. स्टेशन रोड, अहमदनगर) असे त्या आरोपी ट्रकचालकाचे नाव आहे. तो येथील रघुजी ट्रान्सपोर्टमध्ये ट्रकचालक म्हणून नोकरीला होता. तक्रार आल्याने त्याला कंपनीने कामावरून काढून टाकले. या रागातून त्याने संबंधितांवर हल्ले केले. याप्रकरणी त्याच्याविरूद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एसीसी सिमेंट कंपनीच्या केडगावमधील कार्यालयाचे व्यवस्थापक मल्लीनाथ हनुमंत बोगले यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


त्यांनी म्हटले की, १५ जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ट्रकचालक भिमा सकट कार्यालयात आला. तुमच्या कंपनीच्या सांगण्यावरूनच मला माझ्या कंपनीने कामावरून काढून टाकले, असे म्हणत धक्काबुक्की केली, सत्तूरचा धाक दाखविला. रात्री नऊच्या सुमारास तो पुन्हा आला. ऑफीसच्या खिडीकीची काच फोडून ज्वलनशील पदार्थ आतमध्ये टाकला आणि आग लावून दिली. यामध्ये कंपनीचे नुकसान झाले. या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.



दुसरी फिर्याद सोमनाथ अभिमन्यू लोखंडे (ट्रक चालक) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, १७ जून रोजी मी ट्रकमध्ये माल भरून ती घेऊन जात होतो. तेव्हा सकाळी नऊच्या सुमारास आरोपी भिमा सकट दुचाकीवरून आला. माझी गाडी अडविली. व मला म्हणाला की, रघुजी ट्रान्सपोर्टची कोणतीही गाडी मी चालु देणार नाही. मला दिसल्यास मी ती फोडून टाकीन, असे म्हणून त्याने गाडीवर दगडफेक करुन गाडीची समोरील काच फोडली. गाडीच्या केबीनमध्ये येवून मला शिवीगाळ, मारहाण करुन माझ्या खिशातील दोन हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. यानंतर तुमचे ट्रान्सपोर्टची गाडी मला दिसल्यास मी ती फोडून जाळून टाकीन अशी धमकी देऊन निघून गेला.


दोन गुन्हे दाखल झाल्यापासून पोलिस आरोपीचा शोध घेत होते. आरोपीने निर्माण केलेली दहशत लक्षात घेता पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविले. पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी पोलिसांची पथके स्थापन करून शोध मोहीम सुरू केली. आरोपी सकट केडगावमध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याला अटक केली.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या