Ticker

6/Breaking/ticker-posts

पंगत बसली असताना..केवळ २०० रुपयांच वट्कण महागात पडलं..थेट लग्नच मोडलं !

 


लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

कर्जत :लग्न समारंभात अनेक प्रथा चालत आल्या आहेत. त्यातील काही रंगत वाढविणाऱ्या असल्या तरी जास्तच ताणल्यावर लग्नही मोडू शकते.कर्जत तालुक्यातील एका विवाह समारंभात असाच प्रकार घडला. लग्नानंतर वधू-वरांच्या जेवणावेळी वराच्या ताटाला वट्कन लावण्यावरून वाद पेटला. वराकडील मंडळी जास्त पैशांचे वटकण लावण्यावर अडून बसली. त्यातून संतापलेल्या वधुपित्याने थेट लग्नच मोडायचे ठरविले. मग हे प्रकरण पोलिसांत गेले असता तिथेही वधू आणि वधूपिता निर्णयावर ठाम राहिल्याने वराकडील मंडळींनी लग्न होऊनही रिकाम्या हाताने परतावे लागले.


 कर्जत तालुक्यातील एका गावात नुकताच एक विवाह सोहळा पार पडला. वधू-वर दोन्ही याच तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील आहेत. सर्व विधी उत्साहात पार पडले. नवरीच्या पाठवणीच्या आधी वधू-वरांच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी वराच्या ताटाला पैशाचे वटकण लावण्याची प्रथा आहे. प्रथेनुसार वधूकडच्यांनी दोनशे रुपयांचे वटकण लावले. मात्र, ही रक्कम कमी असल्याचे सांगून नवरदेव रुसला. जास्त पैशांचे वटकण लावल्याशिवाय जेवणार नाही, अशी भूमिका वरपक्षाकडून घेण्यात आली. ही वाढीव पैशांची मागणी वधूपित्याने फेटाळली. त्यावरून वाद वाढत गेला. संतापलेल्या वधूपित्याने आपल्या मुलीला सासरी न पाठविण्याचा निर्णय जाहीर केला. ज्या कुटुंबाला मुलीपेक्षा पैसा महत्वाचा वाटतो तेथे मुलगी देण्यात अर्थ नाही. आज हा प्रकार घडला, उद्या आणखी काही मागण्या करून त्रास देतील, त्यामुळे आपण मुलीला सासरी न पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे वधूपित्याचे म्हणणे होते. त्यामुळे वातावरण एकदमच गंभीर झाले.


ग्रामस्थांनी मध्यस्थी करत समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, बराचवेळ झाला तरी वाद मिटत नव्हता. वधूपिता आपल्या निर्णयावर ठाम होता. वर पक्षाने नमते घेऊनही उपयोग झाला नाही. अखेर वर पक्षाने पोलीस ठाणे गाठले. तेथे तक्रार दिली. मात्र, प्रकरण समजुतीतून मिटवावे, असा विचार करून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे तात्काळ विवाहस्थळी आले. त्यांनी नेमका प्रकार समजून घेतला. वधूपित्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निर्णयावर ठाम होते. मग वधूचे मत घेण्याचे ठरले. ती सज्ञात असल्याने तिच्या लग्नाचा निर्णय घेण्याचा तिला पूर्ण अधिकार असल्याचे पोलिसांनी तिला सांगितले. त्यावर तिनेही आपण वडिलांच्या निर्णयासोबत असल्याचे सांगितले. तेथे पोलिसांचाही नाइलाज झाला. शेवटी वरपक्षाला रिकाम्या हाताने परत जावे लागले.


 “  कधी कधी रागाच्या भरात असे निर्णय होतात. त्यामुळे दोन दिवसांनी या दोन्ही कुटुंबाची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यात वाद मिटविण्याचा पुन्हा प्रयत्न केला जाईल. शेवटी वधू-वरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे’’- सुरेश माने, सहायक पोलीस निरीक्षक, कर्जत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या