Ticker

6/Breaking/ticker-posts

वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन बुडाले ; पावसाळी पिकनिक बेतली जिवावर..

 







लोकनेता न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

ठाणेः पावसाळ्याचा मनमुराद आनंद घेण्यासाठी गेलेल्या तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या तीन घटना रविवारी ठाणे शहरात घडल्या आहेत. येऊरच्या नील तलाव परिसरात दिवसभरात दोन जणांचा बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सकाळी एक मृतदेह बाहेर काढून परतलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकांना दुपारनंतर दुसऱ्या तरुणासाठी प्रदीर्घ शोधकार्य मोहिम राबवावी लागली. तर तिसरी घटना लोकमान्यनगर येथील मिलेट्री ग्राऊंड येथील एका डबक्यात पोहण्यासाठी गेलेला तरूण चिखलात रूतून मृत्यूमुखी पडला. त्यामुळे रविवारच्या दिवसभरातील अवघ्या १२ तासांमध्ये तीन जणांचा दुदैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 

येऊरमधील पटोणापाडा येथील नील तलावामध्ये सकाळी ७ वाजता गेलेल्या सहा मित्रांपैकी प्रसाद पावसकर (१६) याचा सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. तलावातील पाण्याचा अंदाज नसताना पाण्यात उडी घेतल्याने तलावातील दगडावर आपटून प्रसादला मार लागला. त्याच्या मित्रांनी त्याला बाहेर काढले परंतु चक्कर आल्याने तो पुन्हा पाण्यात पडला आणि दगडांमध्ये अडकल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.

 

आपत्ती व्यवस्थापन पथकानं घटनास्थळी पोहचून त्यांनी दुपारी ११ वाजता प्रसाद याचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर बचाव पथके परतल्यानंतर ठाण्यातील राबोडी येथील पाच तरुणांचा दुसरा गट दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास त्याच ठिकाणी पोहण्यासाठी गेला होता. त्यापैकी जुबेर सय्यद व अब्दुल हन्नर या दोघांनी पाण्यात उडी मारली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले. इतर मित्रांनी यापैकी अब्दुल हन्नन याला पाण्यातून बाहेर काढल्याने तो वाचला. परंतु जुबेर सय्यद (२०) हा खोल पाण्यात बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला.

 

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत खोल पाण्यात शोध मोहिम राबवून जुबेर याचा मृतदेह बाहेर काढला. खोल पाण्यामध्ये शोध कार्यासाठी अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत घेण्याची वेळ आपत्ती व्यवस्थापन पथकांवर आली होती. अत्यंत धोकादायक परिसर असल्याने या भागात शोध कार्यात अनेक अडचणींचा सामना पथकांना करावा लागला. तर सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास लोकमान्यनगर येथील मिलेट्री ग्राऊंड परिसरातील मोठ्या डबक्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या सुतेश करावडे (३३) या तरूणाचा चिखलात पाय रुतल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुतेश हा लोकमान्यनगर पाडा नंबर ४ येथील राहणारा आहे.

 

 आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलानी तिनही मृत्यदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले. या तीनही मृत्यू प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या