Ticker

6/Breaking/ticker-posts

काँग्रेसने स्वबळावर लढण्याचा निर्धार केल्याने राजकारण तापलं

 

' शिवसेना- राष्ट्रवादीने एकत्र लढावे ही महाराष्ट्रातील जनतेचीही इच्छा !'- जयंत पाटीललोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केल्याने राजकीय पटलावर त्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढतील, अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या भूमिकेचे समर्थन केले आहे.आगामी विधानसभा निवडणुका भाजप स्वबळावर लढणार आहे. तसे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यापाठोपाठ सध्या सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसनेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात निवडणुका स्बवळावर लढणार असा निर्धार करताना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. त्यावर शिवसेना नेते व राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा असतो. त्यातून आता स्वबळाची स्पर्धा सुरू झाली आहे. भाजप आणि काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. मग राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन प्रमुख पक्ष उरतात. या दोन्ही पक्षांनी स्वबळाची भाषा केलेली नाही. त्यामुळे हे दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र येऊन लढले तर निश्चितच चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही, अशाप्रकारची भूमिका शिवसेनेचे मुखपत्र सामनातून मांडण्यात आली आहे.


 त्यावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यायला हवे. त्यातही एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर मात्र उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील. त्यादृष्टीने 'सामना'ने मत व्यक्त केले असून महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते, असे स्पष्ट जयंत पाटील यांनी व्यक्त केले. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या पक्षवाढीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत असतील, असे नमूद करताना प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. म्हणूनच तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे, असेही पाटील पुढे म्हणाले. निवडणुका जवळ आल्यावर कदाचित ते वेगळा विचार करू शकतील पण त्यांनी तसा विचार केला नाही तर मग जे समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील, असेही जयंत पाटील म्हणाले. 


आता निवडणुका नाहीत त्यामुळे यावर रोज चर्चा कशाला करायची? जेव्हा वेळ येईल त्यावेळी नक्कीच चर्चा करू. ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी स्थानिक परिस्थितीचा अंदाज घेऊन चर्चा होईल, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या