अन्यथा..कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन -सावता परिषद.!
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
श्रीगोंदा:- सर्वोच्च न्यायालयाने अतिरिक्त याचिकेवरून काही जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षण स्थगित केले आहे, यामुळे सर्व ओबीसी समाजाला मिळणारे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी जात घटकातील प्रतिनिधित्व व अस्तिव संपुष्टात येणार असून ओबीसी प्रवर्गाची खूप मोठ्या प्रमाणात राजकीय हानी होणार आहे. राजकीय धुरिणानी पाठपुरावा करुन सदरचे आरक्षण पूर्ववत करावे अन्यथा सावता परिषदेच्या वतीने कल्याणराव आखाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
या सर्व विषयावर श्रीगोंदा तालुका सावता परिषदेच्या वतीनं श्रीगोंद्याचे तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात म्हट्ले आहे की, काही जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील आरक्षण स्थगित केले आहे, परिणामी सम्पुर्ण ओबीसी समाज राजकीय प्रवाहातून बाजुला फेकला जाणार आहे. किम्बहुना स्थानिक स्वराज्य संस्था मधील ओबीसी जात घटकातील प्रतिनिधित्व संपुष्टात येणार आहे. भविष्यात राजकारणात अस्तिवच शिल्लक राहणार नाही. ओबीसी प्रवर्गाची खूप मोठ्या प्रमाणात राजकीय हानी होणार आहे. त्यामुळे राजकीय नेतृत्वाने याची वेळीच दखल घेउन योग्य तो पाठपुरावा करण्याची गरज आहे.
यावेळी सावता परिषदेचे श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजू गोरे, जिल्हा कार्याध्यक्ष सावता हिरवे, जिल्हा संघटक चंद्रकांत कोथिंबीरे, सावता युवक परिषदेचे तालुकाध्यक्ष विकास बनकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय खेतमाळीस, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश मेहेत्रे, सावता परिषदेचे संदीप चाकने, सागर बेल्हेकर, सुशीलकुमार शिंदे, लहू हिरडे, श्रीराम खेतमाळीस, मारुती जंबे, दादासाहेब घोडेकर, विवेक कलगुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या