Ticker

6/Breaking/ticker-posts

थेट तहसिलदारांनाच मागितली खंडणी, सापळा रचून तथाकथित सामाजिक कार्यकर्ता अटकेत

 लोकनेता  न्यूज

 (  ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 पारनेर: वरिष्ठांकडे तक्रार न करण्यासाठी दरमहा पन्नास हजार रुपये द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या पारनेर तालुक्यातील कथित सामाजिक कार्यकर्ता अरुण रोडे याला सापळा रचून पकडण्यात आले. रोडे याने तहसिलदार ज्योती देवरे यांच्याकडे ही पैशांची मागणी केली. त्याच्या त्रासाला कंटाळून देवरे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी रोडे याला देवरे यांच्याकडून ३० हजार रुपये स्वीकारताना पकडले. पकडल्यानंतरही पोलिस घेऊन जात असतानाही रोडे धमक्या देतच होता.

 

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, रोडे हा अन्याय निवारण समितीचा जिल्हाध्यक्ष असल्याचे सांगत होता. पारनेर तालुक्यातील वाळू उपशासंबंधी आणि पारनेरच्या तहसिदार कार्यालयातील कामकाजासंबंधी त्याने अनेक तक्रारी केल्या आहेत. या तक्रारी स्थानिक वृत्तपत्र, न्यूज पोर्टल, यू ट्यूबसह अन्य सोशल मीडियातून प्रसारित केल्या जात. त्याच्या लिंक तो रात्री अपरात्री देवरे यांना पाठवत असे. या प्रकाराला देवरे वैतागल्या होत्या. अशा तक्रारी न करण्यासाठी दरमहा पन्नास हजार रुपये द्या, अशी मागणी करीत असे.


१४ जूनला महसूल पथकाने वाळू वाहतूक करणारे एक वाहन पकडले होते. ते सोडून देण्यासाठी रोडे याने देवरे यांना सांगितले होते. मात्र, देवरे यांनी कारवाई केलीच. काय तक्रारी करायच्या त्या करा, आपण वरिष्ठांना स्पष्टीकरण देऊ, असे देवरे यांनी त्याला सांगितले. तरीही रोडे याचा उपद्रव सुरू होता.

देवरे यांनी यासंबंधी पारनेरचे पोलिस निरीक्षक घनशाम बळप यांना माहिती दिली. त्यांनी सापळा रचून रोडे याला पकडण्याची तयारी केली. रोडे याचा पुन्हा फोन आल्यानंतर देवरे यांनी पैसे देण्याची तयार दर्शविली. रोडे पन्नास हजार मागत होता. देवरे यांनी तीस हजार रुपये देण्याची तयार दर्शविली. त्यानुसार रोडे पैसे घेण्यासाठी देवरे यांच्या कार्यालयात आला होता. तेथे पोलिसांनी आधीच सापळा रचला होता.रोडे याने पैसे स्वीकारताच फौजदार हनुमंत उगले, भालचंद्र दिवटे, गहिनाथ यादव यांच्या पथकाने रोडे याला पकडले. पकडल्यानंतरही रोडे पाहून घेईन अशा धमक्या देत होता. गुन्हा दाखल करू नका अन्यथा पाहून घेईन, अशा धमक्या देत होता.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या