Ticker

6/Breaking/ticker-posts

रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न आवश्यक- ना. बाळासाहेब थोरात

*प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांच्या सकारात्मक सहकार्याची गरज








लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

अहमदनगर .: जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आरोग्यविषयक सुविधांमध्ये वाढ करण्यात येत आहे. त्यासोबतच निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील रुग्णसंख्या सातत्याने वाढताना दिसत असून ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नागरिकांनीही आता प्रशासनाच्या उपाययोजनांना सकारात्मक प्रतिसाद आणि सहकार्य करण्याची गरज असून त्यामुळेच कोरोना संसर्ग आटोक्यात येण्यास मदत होऊ शकेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केले.

महसूलमंत्री  थोरात यांनी आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके यांच्यासह नोडल अधिकारी  उपस्थित होते.

यावेळी श्री. थोरात यांनी, जिल्ह्यातील कोरोनासंदर्भातील सद्यस्थिती जाणून घेतली. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या, कोणत्या भागात रुग्णवाढीचा वेग जास्त आहे,  कोविड केअर सेंटर आणि तेथील परिस्थिती, कोरोना उपाययोजनांची अंमलबजावणी यासंदर्भात त्यांनी तपशीलवार आढावा घेतला. सध्या जिल्ह्यातील औषधसाठा आणि उपलब्धता व मागणी, ऑक्सीजन उपलब्धता, आदींचाही त्यांनी आढावा घेतला.

महसूलमंत्री श्री. थोरात म्हणाले, सध्या नगर शहर, नगर ग्रामीण आणि कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातही रुग्णवाढीचा वेग मोठा आहे. रुग्णांचे  घरी विलगीकरण आता सक्तीने बंद करुन त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करणे आवश्यक आहे. अशावेळी प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. सध्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. बहुतांशी नागरिक त्याचे पालन करताना दिसत आहेत. मात्र, कोरोना संसर्ग आटोक्यात आणायचा असेल तर सर्वांनीच प्रशासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याची गरज आहे. चेहऱ्यावर मास्क असणे, सोशल डिस्टंन्सिंग पाळणे अत्यावश्यक आहे. सर्वांनीच आता त्याचा जबाबदारीने अवलंब करणे आवश्यक आहे.  बाधितांपासून संसर्ग रोखण्यासाठी आता  शहरी भागात सर्वेक्षण पथकांद्वारे घरोघऱी सर्वेक्षण केले जाणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वच कोविड केअर सेंटर आणि रुग्णालयांनी त्यांची व्यवस्था अधिक चांगली असेल आणि रुग्णांना तेथे अडचणी जाणवणार नाहीत, यासंदर्भात सूचना मागील बैठकीत केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत असल्याबाबत सातत्याने लक्ष देण्याची  गरज आहे. सध्या रुग्णवाढीचा वेग पाहता रुग्णांसाठीच्या बेडसची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नियोजन आणि कार्यवाही वेळेवर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

सध्या जिल्ह्यासाठी आवश्यक ऑक्सीजन उपलब्ध होत आहे. याशिवाय जिल्ह्यात ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प सुरु झाल्यानंतर आपल्याला जिल्ह्यातील रुग्णांची गरज भागवून  पुरेसा ऑक्सीजन उपलब्ध होईल. ऑक्सीजन उपलब्धतेसंदर्भात जिल्ह्याची निकड, भौगौलिक परिस्थिती लक्षात घेऊन जास्तीचा पुरवठा व्हावा, यासंदर्भात अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्याने आता वेळेत ऑक्सीजन जिल्ह्यासाठी प्राप्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

कोरोना उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यासंदर्भात सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असून ही वेळ मतभेदाची नाही. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम केले पाहिजे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखली आणि आपण संसर्गाची साखळी तोडण्यात यशस्वी ठरलो तर आपोआपच आरोग्य यंत्रणेवर येणारा ताण कमी होईल. असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या जिल्ह्यात तसेत राज्यात लसीकरण मोहिम राबविली जात आहे. आता १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण सुरु करण्यात आले आहे. मात्र, अॅपवरील तांत्रिक अडचणी, लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी यामुळे यामध्ये अधिक सुसूत्रता आणण्याची गरज आहे. वास्तविक, राज्यासाठी असे स्वतंत्र अॅप आणि रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. सध्या केंद्र सरकारच्या स्तरावरुन लसीकरण संदर्भातील अॅपचे संनियंत्रण होत असल्याने त्यात काही अडचणी निश्चितपणे आहेत, असे श्री. थोरात यांनी नमूद केले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. जिल्ह्यातील ऑक्सीजन निर्मीती प्रकल्प, रेमडेसीवीर तसेच इतर औषधांची उपलब्धता याबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बैठकीनंतर महसूलमंत्री श्री. थोरात यांनी बूथ हॉस्पिटल येथेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत भेट देऊन पाहणी केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या