Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबजनक : कोविड वॉर्डात अनेक मृतदेह पडून; चित्रिकरण केल्याने डॉक्टरकडून मारहाण?

 लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

अ.नगर: रुग्णाच्या आजूबाजूला पडलेल्या मृतदेहांचे चित्रिकरण केले आणि पक्के बिले मागितल्याच्या रागातून नगरमधील एका कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णाच्या नातेवाईकाला लोखंडी गजाने मारहाण केली. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. तर डॉक्टरांनीही नगरच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने नातेवाईकांविरुद्धही गुन्हा दाखल झाला आहे.

नगर शहरातील स्वस्तिक चौकातील   पॅसिफिक केअर सेंटर या खासगी कोविड रुग्णालयात ही घटना घडली. जामखेड नगरपालिकेतील लिपीक आकाश भागवत डोके (वय २६) यांनी ही फिर्याद दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्यांचे मेहुणे भागवत सुपेकर यांना करोना संसर्गाची लागण झाल्यामुळे ५ मे रोजी नगरच्या या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे नातेवाईक आकाश डोके आणि संजीव जाधव त्यांना भेटण्यासाठी ८ मे रोजी गेले असता सुपेकर हे खूप घाबरलेले होते. त्यांच्या आजूबाजूला काही मृतदेह अनेक तासांपासून पडून होते. ते हलवण्याची विनंती कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांना केली. मात्र त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून आकाश डोके यांनी तेथील प्रकार मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला. १० मे रोजी नातेवाईक सुपेकर यांचा मृत्यू झाल्याचे डोके यांना कळविण्यात आले. त्यानुसार डोके व त्यांचे मामा संजय किसन जाधव जामखेडहून रुग्णवाहिका घेऊन मृतदेह नेण्यासाठी नगरला आले. तेथे डॉ.प्रशांत जाधव यांनी आधी बिल भरा, नंतर मृतदेह ताब्यात मिळेल, असे सांगितले. बिलाची विचारणा केली असता २ लाख ६५ हजार रुपये बिल झाल्याचे सांगण्यात आले व त्याचे कच्चे बिल दिले. त्यावर डोके यांनी पक्के बिल द्या, अशी मागणी केली.

 त्याचा तेथील कर्मचाऱ्यांना राग आला. तेथे उपस्थित कलाराज पाटील, बाळकृष्ण पाटील यांनी डोके यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत रुग्णालयाच्या बाहेर नेले. थोड्यावेळात तेथे यश पोळ, बळराम पाटील आले. त्यांनी डोके व त्यांचे मामा जाधव यांना मारहाण करीत रुग्णालयाच्या बिलिंग रूममध्ये नेले. नंतर तेथे डॉ. प्रशांत जाधव तिथे आले. त्यांच्या हातात लोखंडी गज होता. त्यांनी त्या गजाने मारहाण केली. तेव्हा डोके यांचे आणखी काही नातेवाईक धावून आले व त्यांनी त्या दोघांची सुटका केली. अशी फिर्याद डोके यांनी जामखेड पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार जामखेड पोलिसांनी डॉ. प्रशांत जाधव, कृष्णराज पाटील, बाळकृष्ण पाटील, यश पोळ व बळराम पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण नगरच्या कोतवाली पोलिसांकडे तपासासाठी पाठवून दिले आहे.

दरम्यान, घटना घडल्यानंतर डॉ. जाधव यांनीही डोके आणि त्यांचे मामा जाधव यांच्यासह चार जणांविरुद्ध नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांच्याविरुद्धही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधल्या काळात शहरातील काही मंडळींच्या मध्यस्थीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या