Ticker

6/Breaking/ticker-posts

''पीएम केअर'ला निधी दिला, तसा 'सीएम फंडा'ला देण्यासाठी, तसंच पत्र लिहिण्याचे धाडसही दाखवा'

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

अहमदनगर :  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फ़ड्णवीस यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना एक पत्र पाठविले आहे. महाराष्ट्रातील आघाडीचे सरकार राज्यातील करोना परिस्थिती हातळण्यास अपयशी ठरत असल्याकडे पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे. या पत्राला सत्ताधारी आघाडीच्या काही नेत्यांनी उत्तरे दिली आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही फडणवीस यांच्या या कृतीला सडेतोड उत्तर दिले आहे. राज्य अडचणीत असताना 'सीएम फंडा'ऐवजी 'पीएम केअर' ला निधी देण्याचे आवाहन करणारे विरोधी पक्ष नेते केंद्राकडून राज्याला मदत मिळण्यासाठी पत्र लिहून पाठपुरावा करण्याचे धारिष्ठ दाखविताना दिसत नाहीत, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

यासंबंधी पवार यांनी म्हटलं आहे. ' राज्य सरकार, आरोग्य आणि इतर यंत्रणा कसं काम करतायेत हे मी जवळून पाहत आहे. त्यांच्या या कष्टावर राजकीय हेतूने कोणी पाणी फिरवत असेल तर ते योग्य नाही म्हणून आणि वस्तुस्थिती पुढं यावी म्हणून मी हे बोलत आहे. कोणावर टीका करणं हाही माझा हेतू नाही. राज्यातील विरोधक राज्य सरकारवर टीका करत असताना खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्र सरकारने केलेल्या उपाय योजनांची जाहीर प्रशंसा केली. सुप्रीम कोर्टानेही महाराष्ट्राच्या मॅनेजमेंट व ऑक्सिजन पुरवठ्याची स्तुती केली. जागतिक अर्थतज्ञ आणि 'आरबीआय'चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही महाराष्ट्र सरकारचं कौतुक करत महाराष्ट्र सरकार ऑक्सिजन बेड तरी पुरवू शकलं, पण इतर राज्यांना तेही करता आलं नाही, असं म्हटलं आहे. मात्र तरीही राज्यातील भाजपचे नेते केवळ राजकारणासाठी या सगळ्या चांगल्या गोष्टींकडं दुर्लक्ष करत आहेत, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.



त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करोनाच्या बाबतीत राजकारणाच्या पलीकडं जाऊन काम करताना दिसतात, 'आजच्या करोनाच्या परिस्थितीत राजकारण करू नका,' अशा स्पष्ट शब्दात त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांची एका कार्यक्रमात कानउघाडणीही केल्याच्या बातम्या वाचल्या आहेत. तरीही राजकारण करण्याची विरोधी पक्षातील काही नेत्यांची हौस फिटत नाही. राज्यातील अनेक प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत. याबाबतही त्यांनी एखादं पत्र केंद्र सरकारला लिहिलं तर राज्यातील जनता निश्चितच त्यांचं स्वागत करेल,' असंही पवार यांनी म्हटलं आहे.


रोहित पवार यांनी उपस्थित केलेले मुद्दे

*महाराष्ट्राची रुग्ण संख्या सर्वाधिक असूनही भाजपशासित राज्यांना प्राधान्य देण्यात आलं. केंद्रीय अर्थसंकल्पात ३५ हजार कोटींची तरतूद असतांनाही आर्थिक अडचणीतून जात असणाऱ्या राज्यांवरच लसीकरणाचा अधिकचा भार केंद्राने टाकला.



*मुंबई महानगरपालिका आणि आरोग्य विभागाने सातत्याने उपाय योजना करून मुंबईतील मृत्यूदर नियंत्रणात आणला याचं त्यांना कौतुक नाही. ज्या राज्याचे आपणही नागरिक आहात त्या राज्यात आणि राजधानीत कोरोनाचा आलेख स्थिरावतोय ही बाब आपल्याला आनंद देणारी का नाही?

*राजकीय आरोप करत असतांना आपल्या पक्षाचे सरकार ज्या राज्यांमध्ये आहे तिथल्या परिस्थितीचा आपण नीट अभ्यास केल्यास तेथील यंत्रणा किती मोठ्या प्रमाणात अयशस्वी झाली ही आपल्या लक्षात येईल.

*उत्तर प्रदेश, कर्नाटक या भाजपशासित राज्यांमधील रुग्ण प्रवास करून महाराष्ट्रात उपचारासाठी येत आहेत. तिकडे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमीही अपुऱ्या पडत आहेत. अनेक मृतदेह गंगा किनारी पुरले जात असल्याचं तर काही नदीत ढकलले जात असल्याचं विदारक चित्र संपूर्ण जग उघड्या डोळ्यांनी पाहतंय.

*भाजपाशासित गुजरातमध्ये १ मार्च ते १० मे २०२१ दरम्यान १ लाख २३ हजार ८७१ मृत्यू प्रमाणपत्र दिले आणि प्रत्यक्षात मात्र या कालावधीत केवळ ४२१८ मृत्यू करोनाने झाल्याची नोंद केली. पण गेल्या वर्षी याच कालावधीत दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्रांची तुलना केली तर यंदा तब्बल १.२० लाख मृत्यूचे दाखले अधिक देण्यात आले. याचं गौडबंगाल काय? यावर राज्यातील विरोधी का पक्ष गप्प आहे?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या