Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना रुग्णांच्या मृत्यूनंतर शेवटची वाटही ‘अंधारकारमय’; अखेर अशी झाली प्रकाशमान !

 









लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 अहमदनगर:- 'मंजुरी नाही, निधी नाही आणि साहित्य उपलब्ध नाही...',  ही महापालिकेच्या कोणत्याही कामासंबंधी अनेकदा ठरलेली उत्तरे असतात. अशीच  उत्तरे अमरधामच्या प्रवेशद्वारावरील गेलेले विद्युत दिवे बदलण्यासाठी मिळत होती. करोनाच्या महामारीत अमरधाममध्ये रात्रंदिवस अंत्यसंस्कार सुरू आहेत. रात्री येणाऱ्यांना अंधारात चाचपड यावे लागत होते. करोना आणि अन्य कारणांमुळे मृत्यू झालेल्यांची अंतिम वाटही आंधरलेली होती. अखेर जागरुक नागरिक मंचाने वर्गणी करून तेथे दिवे बसविले आणि ही वाट प्रकाशमान झाली.


नगरच्या अमरधाममध्ये सध्या दररोज ५० ते ६० मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत आहेत. आधीच येथे अपुऱ्या सुविधा आहेत. त्यातच मनपाचे याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. अमरधामच्या प्रवेशद्वारावर अंधार असल्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. करोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणाऱ्यांचा सन्मान करण्यासाठी जागरूक नागरिक मंचाचे सदस्य रात्री अमरधाममध्ये गेले होते. त्यावेळी मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे यांच्या ही गोष्ट लक्षात आली. चौकशी केली असताना महापालिकेने विविध कारणांमुळे हे दिवे बसविण्याकडे अनेक दिवसांपासून दुर्लक्ष केल्याची माहिती मिळाली.

अमरधामच्या प्रवेशाद्वारावरच मोठा खड्डा आहे. येथे प्रथमच येणाऱ्या नागरिकांना याची माहिती नाही. त्यामुळे अपघात होण्याचीही शक्यता होती. येथे रात्री प्रकाश असणे अवश्यक होते. त्यामुळे मुळे यांनी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क करून याची माहिती देत दिवे बसविण्याची सूचना केली. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. प्रत्यक्षात मात्र काम झाले नाही. कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली की, यासाठीचे साहित्य महापालिकेकडे नाही.


त्यानंतर मुळे यांनी जागरुक नागरिक मंचातर्फेच येथे दिवे बसविण्याचे ठरविले. तसं आवाहन केलं असता अरुण राधाकृष्ण दळवी आणि वसंत लोढा यांनी दोन हॅलोजन लँप देणगी म्हणून दिले. मुळे यांच्या हस्ते कैलास दळवी, वसंत लोढा, संजय वल्लाकट्टी यांच्या उपस्थितीत हे दिवे संबंधित कर्मचाऱ्यांकडे देऊन तेथे बसविण्याची व्यवस्था केली. आता तेथील अंधार आणि मृतांच्या नातेवाईकांचाही गैरसोय दूर झाली आहे. आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला निघालेल्यांच्या मार्गावर महापालिका प्रकाश देऊ शकली नाही, तेथे स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार कामाला आला, अशी आत शहरात चर्चा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या