Ticker

6/Breaking/ticker-posts

लोकांना रोज भेटायला मी काही सरपंच नाही; शिवसेना खासदाराचं टीकेला उत्तर

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

 

शिर्डी :- शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे मतदारसंघात आभावानेच दिसतात आणि लोकांना भेटत नाहीत, अशी त्यांच्याविरूद्ध मागील कार्यकाळापासूनची तक्रार आहे. त्यांच्यावरील या टीकेला त्यांनी आज थेट उत्तर दिले. ते म्हणाले, 'गावचे सरपंच लोकांना रोज भेटू शकतात. मी सरपंच नव्हे तर खासदार आहे. रोज भेटत नसलो तरी मतदारसंघासाठी माझी कामे सुरूच असतात.'


करोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी शिर्डीत आले असता खासदार लोखंडे पत्रकारांशी बोलत होते. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोखंडे निवडून आलेले असले तरी त्यांचे वास्तव्य मुंबई आणि दिल्लीतच असते. त्यामुळे मागील कार्यकाळापासून ते भेटत नसल्याच्या मतदारसंघातून तक्रारी होत असतात. करोनाच्या संकटातही सुरवातीच्या काळात ते भेटायला आले नसल्याची लोकांची तक्रार आहे. यावरूनच नेवासा येथील आढावा बैठकीच्यावेळी त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न झाला होता. या टीकेबद्दल विचारले असता लोखंडे म्हणाले, 'लोकसभेचे अधिवेशन, इतर बैठका यासाठी वर्षातील सुमारे दोनशे दिवस दिल्लीतच जातात. उरलेल्या काळात मतदारसंघासाठीची कामे सुरू असतात. मी भेटलो नाही, याचा अर्थ काम करीत नाही, असा होत नाही. माझे काम सुरूच असते. गावचा सरपंच रोज भेटू शकतो, मी सरपंच नाही, खासदार आहे. सर्वसामान्य जनतेला हे माहिती आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, असं लोखंडे यांनी म्हटलं आहे.


' कोणताही राजकीय वारसा नाही, कोणतेही कारखाने नाहीत, सहकारी संस्था, बँका नाहीत, असे असताना मला या मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून दिले आहे. याच जिल्ह्यातून तीन वेळा आमदारही झालो आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना व राज्य सरकारचे सहकार्य घेऊन विकास कामासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. मतदारांना सतत प्रत्यक्ष भेटणे होत नसले तरी त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी माझे काम सुरूच असते. इतरांप्रमाणे वेळ देऊ शकत नसलो तरीही जेव्हा शक्य होते, तेव्हा जास्तीत जास्त लोकांना भेटण्याचा माझा प्रयत्न असतो,' असेही लोखंडे म्हणाले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या