Ticker

6/Breaking/ticker-posts

एसटी कर्मचाऱ्यांना पुढच्या पगाराची चिंता

 







लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क   )

 औरंगाबाद:  राज्यात 'ब्रेक दि चेन'अंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. या काळात एसटीची प्रवासी वाहतूकही प्रवासी नसल्याने बंद आहे. उत्पन्न नसल्याने मे महिन्याचा पगार मिळेल का, अशी चिंता कर्मचाऱ्यांसमोर आहे. महामंडळाच्या स्थानकांवर सध्या शांतता आहे. निर्बंधात बसमध्ये पन्नास टक्के प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. औरंगाबादहून विविध शहरांकडे जाणाऱ्या बसला प्रवासी नसल्याने औरंगाबादहून जाणाऱ्या आणि औरंगाबादला येणाऱ्या सर्वच बससेवा बंद आहे. गेल्या लॉकडाउनच्या काळातही कर्मचाऱ्याच्या पगाराचा मुद्दा गाजला होता. यानंतर शासनाने दिलेल्या पैशांमधून महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात आला होता.

या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात एसटीला उत्पन्न कमी मिळाले आहे. मे महिन्यात तर एसटीचे उत्पन्न अतिअल्प आहे. एसटीला मालवाहतुकीतून थोड्या फार प्रमाणात उत्पन्न चालू आहे. कडक निर्बंधामुळे बाजारपेठही बंद असल्याकारणाने मालवाहतुकीला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. शासनाने एसटीला एक हजार कोटी रूपये देण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर एसटीला टप्प्याटप्प्याने निधीही देण्यात आला. एप्रिलचा पगार देण्यासाठी शासनाने १३० कोटी रूपये दिले होते. त्यातून पगार देण्यात आलेले आहे.

पुढील महिन्यात मेचा पगार देण्यासाठी एसटीकडे पैसे राहणार नाहीत. यामुळे मेचा पगार होणार किंवा नाही, याची चिंता कर्मचाऱ्यांना लागली आहे.

विलीनीकरणाची मागणी

दरम्यान, एसटीला गेल्या लॉकडाउन आणि सध्याच्या कडक निर्बंधामुळे तोटा सहन करावा लागत आहे. हा तोटा वाढत चालला आहे. यामुळे एसटीला शासनात विलगीकरण करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. आगामी काळात या मागणीसाठी आंदोलन पेटण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या