लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
शिर्डी: १२ मे सर्वत्र परिचारिका दिन म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांचा
गौरव होत असताना शिर्डीत मात्र कंत्राटी परिचारिकांवर आपल्या हक्कांसाठी आंदोलन
करण्याची वेळ आली. त्यांना हे आंदोलनही सुखासुखी करता आले नाही, त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी शिर्डी संस्थानचे
वरिष्ठ अधिकारी आले नाहीच, उलट पोलिसांनी परिचारिकांना
ताब्यात घेऊन आंदोलन मोडून काढले. प्रशासन आणि पोलिसांच्या या दडपशाहीचा परिचारिका
संघटनेसह अन्य नागरिकांनीही निषेध केला आहे.
शिर्डीच्या साईबाबा संस्थानची साईनाथ
रुग्णालयआणि साईबाबा मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल अशी दोन रुग्णालये आहेत. तेथे १९० कंत्राटी परिचारिका
तसेच परिचारक यांच्या वेतनासंबंधीच्या जुन्याच मागण्या आहेत. इतर कायम
कर्मचाऱ्यांप्रमाणे ४५ हजार रुपये वेतन आणि समान काम मिळावे, ही त्यांची
प्रमुख मागणी आहे. यासाठी पूर्वीही अनेकदा आंदोलने झाली. सध्या करोना साथीमुळे
कामही वाढले आहे. त्यामुळे आज परिचारिका दिनाचे औचित्य साधून या कर्मचाऱ्यांनी
आंदोलन केले. काम बंद करून त्यांनी रुग्णालयाबाहेर ठिय्या दिला. त्यांचे म्हणने
ऐकून घेण्यास संस्थानचे वरिष्ठ अधिकारी आले नाहीत. मात्र, थोड्या
वेळाने पोलीस आले. साथ रोग नियंत्रण कायदा लागू असल्याने आंदोलन करता येणार नाही,
असे सांगून मोठा फौजफाटा घेऊन आलेल्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात
घेतले. सुमारे दहा जणांना बळजबरीने पोलिसांच्या गाडीत नेऊन बसविले. आमच्या मागण्या
ऐकून तरी घ्या, आधीच आमच्यावर अन्याय झाला आहे, आता पोलिसांनी आणखी त्रास देऊ नये, अशी विनवणी
परिचारिका करीत होत्या.
शिर्डीतील या रुग्णालयांत कोविड
केअर सेंटरही सुरू करण्यात आले आहे.
त्यामुळे कामाचा ताण अधिक वाढला आहे. त्यामुळे या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या
मागण्या नेटाने मांडण्यासाठी हे आंदोलन केले. कायम कामगारांप्रमाणे किमान वेतन
देण्यात यावे, परिचारिकांच्या परिवाराला विमा संरक्षण, दरमहा चार
पगारी सुट्ट्या मिळाव्यात या प्रमुख मागण्या त्यांच्या आहेत.
वेळोवेळी निवेदने देऊनही
साईबाबा संस्थानच्या प्रशासनाकडून त्यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज काम
बंद आंदोलन करण्यात आले. तर त्यांच्यावर पोलिसी कारवाईला समारे जाण्याची वेळ आली.
पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप काही आंदोलकांनी केला. मात्र, पोलिसांनी तो फेटाळून लावला असून बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी आंदोलकांना
रितसर ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
0 टिप्पण्या