Ticker

6/Breaking/ticker-posts

'जबरदस्त विजयासाठी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन’ ! शरद पवारांकडून दीदींना शुभेच्छा..

 
लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या निकालाचे कल आता स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत जनतेनं पुन्हा एकदा सद्य मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याच पारड्यात आपली मतं टाकल्याचं दिसून येतंय. निवडणुकीचे कल हाती आल्यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोशल मीडियावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलंय.

' जबरदस्त विजयासाठी ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन! जनतेच्या कल्याणासाठी तसंच साथरोगामुळे समोर ठाकलेल्या आव्हानाला सामूहिकरित्या सामोरं जाण्यासाठी आपलं कार्य चालू ठेवू' असं शरद पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
तर, तामिळनाडूमध्ये डीएमकेनं मिळवलेल्या निर्णायक आघाडीसाठी शरद पवार यांनी एम के स्टॅलिन यांचंही कौतुक केलंय. ' आपल्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या जनतेच्या सेवेसाठी शुभेच्छा' असं ट्विट पवारांनी केलंय.

पश्चिम बंगालमध्ये १४७ हा बहुमताचा आकडा आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसनं हा आकडा अगदी सहजच पार केलाय. दुसऱ्या क्रमांकावर राज्यात भाजपला स्थान मिळालंय. भाजपनंही १०० हून अधिक जागांवर वर्चस्व मिळवल्याचं या निकालातून दिसून येतंय. पश्चिम बंगालमध्ये २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी एकूण आठ टप्प्यांत मतदान पार पडलं. बंगालमध्ये २७ मार्च, , , १०, १७, २२ आणि २६ एप्रिल अशा आठ टप्प्यांत नागरिकांनी आपलं मत नोंदवलं.

शरद पवार यांचा ममता दीदींना पाठिंबा
करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकी दरम्यान शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासहीत देशभरातील विरोधी पक्षनेत्यांना एक पत्र लिहून एकजूट होत लढण्याचं आव्हान केलं होतं. तर पश्चिम बंगालच्या रणसंग्रामात आपण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पाठिशी उभं राहणार तसंच त्यांच्यासाठी राज्यात प्रचारदौरे करणार असल्याचंही शरद पवार यांनी जाहीर केलं होतं.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'बहीण' संबोधताना पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींना सत्तेतून दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासहीत ५० मंत्री आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही प्रयत्न करत असल्याचं शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हटलं होतं. केंद्र सरकार १० वर्ष सत्तेत राहणाऱ्या एकट्या महिलेविरुद्ध आपली संपूर्ण ताकद खर्ची घालत असल्याची टीकाही शरद पवार यांनी भाजपवर केली होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या