Ticker

6/Breaking/ticker-posts

खळबळजनक :शेवगाव डीवायएसपी कार्यालयातील त्या ' त्रिमूर्ती ' वर एसीबीची कारवाई

   खाकीवरील कारवाईने नगर जिल्ह्यात खळबळ

लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क)

शेवगाव :-शेवगावच्या डीवायएसपी कार्यालयातील त्या बहुचर्चित तीन पोलिस शिपायांविरुद्ध अखेर एसीबीने आज सोमवारी (दिं.३रोजी) शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. एकाच वेळी तीन पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच तिन्ही पोलीस कर्मचारी पसार झाल्याचे वृत्त आहे.

      गेल्या अनेक दिवसापासून शेवगावचे डीवायएसपी कार्यालय हप्तेखोरीमुळे चर्चेत आहे. वाळूचा अवैध उपसा व वाहतूक करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील एका व्यवसायिकाने वसंत फुलमाळी, कैलास पवार व संदीप चव्हाण या पोलिस कर्मचाऱ्यांनी १५ हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार एसीबीच्या नगर कार्यालयाकडे पुराव्यानिशी केली होती.

    एसीबीने ऑडीओ व व्हिडीओ क्लिपची पंचासमक्ष पडताळणी केल्याने व तक्रारदार यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने एसीबीचे नगरचे पोलीस उप अधीक्षक हरीश खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम पवळे यांनी आज या तिन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल केला.

       गेल्या आठवड्यात एसीबीने यासंदर्भातील अहवाल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचेकडे सादर केला होता. या अहवालाच्या अनुषंगाने संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांची मुख्यालयात बदलीही करण्यात आली. मात्र, आज एसीबीने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून नगर जिल्हा पोलीस यंत्रणेला दणका दिला आहे. शेवगावच्या उपविभागीय डीवायएसपी कार्यालयांतर्गत शेवगाव, पाथर्डी, नेवासा, सोनई व शनीशिंगणापुर पोलिस स्टेशनचा समावेश आहे. आजच्या कारवाईमुळे या पोलिस स्टेशनमधील अधिकारी, कर्मचारी हादरले आहेत. खाकीवरील या कारवाईची जिल्ह्यात खमंग चर्चा सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या