Ticker

6/Breaking/ticker-posts

लॉकडाऊनमुळे अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त हुकला , सराफा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका; 800 कोटींचे नुकसान

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क  )

 

मुंबई: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शुक्रवारी अक्षय्यतृतीयेचा सोने खरेदीचा शुभमुहूर्त टळला गेला. त्यामुळे राज्यातील सराफा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याचे समजते. सोन्या-चांदीची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी नसल्याने फक्त मुंबईतील सोने बाजाराचे जवळपास 800 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला.

 

सध्या लॉकडाऊनमुळे केवळ ऑनलाईन पद्धतीने किंवा गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून सोने खरेदी शक्य आहे. कोरोनामुळे जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सोने आणि चांदीचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. औद्योगिक मागणीत सुधारणा झाल्यामुळे चांदीचा दरही वाढत आहे.

गेल्यावर्षी सोन्याने प्रतितोळा 56 हजारांपर्यंत उच्चांक गाठला होता. त्यावेळी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर प्रतितोळा 52 हजारांच्या आसपास होता. तर यंदाच्या तृतीयेला सोन्याचा दर प्रतितोळा 49 हजार इतका होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव प्रति औंस 1834 डॉलर इतका होता. त्याचबरोबर चांदीचा भाव प्रतिऔंस 27.20 डॉलर इतका आहे. HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, कॉमेक्स (न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज) मधील रिकव्हरीमुळे दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचे भाव 146 रुपयांनी वधारले. भारतात अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोन्याच्या किमती वाढल्या होत्या.

सोन्याच्या व्यवहारांसाठी सरकार विशेष धोरण आखण्याच्या तयारीत

‘ इकॉनॉमिक टाईम्स’च्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून सोन्यासह मौल्यवान धातुंच्या व्यवहारांसाठी एक विशेष धोरण आखण्याची तयारी सुरु आहे. त्यानुसार सोन्यातील गुंतवणुकीचा संपत्तीमध्ये (Asset) समावेश होईल. सध्याच्या नियमांनुसार दागिन्यांचा समावेश ‘undisclosed treasure’ मध्ये केला जातो.

भारतात दरवर्षी 850 टन सोन्याची आयात होते. त्यामुळेच या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडून ही पावले उचलली जात आहेत. आगामी अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या व्यवहारासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या