Ticker

6/Breaking/ticker-posts

फोन टॅपिंग प्रकरणी तपासाला वेग; IPS रश्मी शुक्ला यांना बजावले समन्स

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई:फोन टॅपिंग प्रकरणी तपासाला वेग आला असून याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध बीकेसी सायबर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठ आयपीएस अधिकारी  रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आले आहे.

भारतीय टेलिग्राफी अॅक्ट कलम ३०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ४३ व ४६ तसेच ऑफिशियल सीक्रेट अॅक्ट ०५ अन्वये रश्मी शुक्ला यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. बुधवार दि. २८ एप्रिल रोजी त्यांना जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स धाडण्यात आले आहे. रश्मी शुक्ला या सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक आहेत. हैदराबाद येथे त्या कार्यरत आहे. फेब्रुवारीपासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर आहेत.

रश्मी शुक्ला यांचा जबाब ठरणार महत्त्वाचा

फोन टॅपिंग प्रकरणाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. याप्रकरणी २७ मार्च रोजी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे 
यांनी आपला अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. या अहवालानंतर राज्य गुप्तचर विभागाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी फोन टॅपिंग अहवाल लीक केल्याप्रकरणी अज्ञातांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्याच्या अनुषंगाने आता रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. रश्मी शुक्ला यांना बुधवारी सकाळी ११ वाजता सहायक पोलीस आयुक्त एन. के. जाधव यांच्यासमक्ष जबाब नोंदवायचा असून हा जबाब संबंधित प्रकरणाच्या तपासात महत्त्वाचा ठरणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणाच्या अनुषंगाने अन्य काही वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय व्यक्तींनाही चौकशी अधिकाऱ्यांकडून बोलावले जावू शकते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

आव्हाड यांनी केला होता आरोप

रश्मी शुक्ला यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख असताना काही व्यक्तींच्या नावे फोन टॅपिंगची परवानगी घेऊन भलत्याच व्यक्तींचे आणि मंत्र्यांचे फोन टॅप केले होते व या फोन टॅपिंगचा अहवाल लीक केला गेला असा खळबळजनक आरोप राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड 
यांनी केला होता. विरोधी पक्षांच्या नेत्यांनी या लीक अहवालाचा आधार घेत पोलीस दलात बदल्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळेच या प्रकरणी चौकशी व्हावी अशी विनंती काही मंत्र्यांनी मुख्यमंत्रीउद्वव ठाकरे यांच्याकडे केली होती.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या