Ticker

6/Breaking/ticker-posts

लॉकडाऊनमध्ये पैशाला सांभाळा, IDBI बँकेवर ऑनलाईन दरोडा, काही खातेदारांचे अकाऊंट रिकामे

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

डोंबिवली (ठाणे) : राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा पंधरा दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित झाला आहे. गेल्या वर्षातही अनेक महिने राज्यासह देशभरात लॉकडाऊन लागू होता. त्यामुळे अनेकांवर आर्थिक संकट ओढावलं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. आजही लोकांकडे खर्च करण्यासाठी पैसे नाहीत. अशा परिस्थितीत डोंबिलीतून धक्कादायक घटना समोर आली आहे. आयडीबीआय बँकेच्या खात्यातून तब्बल ३० ग्राहकांचे पैसे गहाळ झाल्याची घटना घडली आहे. या संपूर्ण प्रकरणावर बँक प्रशासन काही बोलण्यास तयार नाही. याप्रकरणी सध्या डोंबिवली पोलिसांचा तपास सुरु आहे.

 

 नेमकं प्रकरण काय?

डोंबिवली पूर्व भागातील फडके रोडवर आयडीबीआय बँकेची शाखा आहे. या शाखेत असलेल्या अनेक ग्राहकांच्या खात्यातून पैसे गहाळ झाल्याची बातमी कळताच बँकेत गर्दी झाली. माहिती समोर आली की, एक दोन नाही तर अनेकांचे पैसे ऑनलाईन काढण्यात आले आहेत. राज्यात आधीच लॉकडाऊन आहे. कोरोनामुळे भयानक परिस्थिती आहे. कोरोनाची लागण झाली तर औषधांसाठी भरपूर खर्च येतो. त्यामुळे अशा परिस्थितीत पैसे जवळ असणं जास्त जरुरीचं आहे. मात्र, बँकेत अकाउंटमध्ये असलेले पैसे असे अचानक कोणीतरी ऑनलाईन पद्धतीने पळवून नेले तर सर्वसामान्यांनी नेमकं काय करावं? हाच प्रश्न उपस्थित होतोय.

ग्राहकांची पोलिसात धाव

ज्या लोकांच्या बँकेतून ऑनलाईन अचानक पैसे कापले गेले त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. खातेदारांनी पोलिसांना सांगितले की, कमीत कमी 50 खातेदारांच्या खात्यातून पैसे गहाळ झाले आहेत. मात्र पैसे गहाळ झाल्यानंतर बँकेकडून जी प्रक्रिया करण्यास सांगितली गेली, ती सुद्धा ग्राहकांना त्रसदायक होती. एकीकडे पैसे गेले. दुसरीकडे प्रक्रियेत तासंतास गेल्याने खातेदार हैराण झाले. या संपूर्ण प्रकरणाचा लवकरच छडा लावला पाहिजे, अशी खातेदारांची मागणी आहे

बँक प्रशासन आणि पोलिसांची भूमिका काय?

याबाबत आम्ही जेव्हा बँकेच्या शाखेचे मॅनेजरांशी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी काही न बोलता तोंड लपविण्याचा प्रयत्न केला. या घटनेविषयी डोंबिवलीचे एसीपी जे. डी. मोरे यांनी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणी आतापर्यंत तीस जणांची तक्रार प्राप्त झाली आहे. बँकेच्या बाजूला एटीएम मशीन आहे. या मशीनमधूनच हा प्रकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जास्त ग्राहकांनी या मशीनचा वापर केला आहे. आरोपींनी एटीएममध्ये स्किनिंग केले असावे. त्याआधारे ऑनलाईन पद्धतीने पैसे काढले गेले असावेत. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरु आहे”, असं एसीपी मोरे यांनी सांगितलं. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे, अशी मागणी बँक खाता धारकाकडून केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या