Ticker

6/Breaking/ticker-posts

करोना : टास्क फोर्सची केली स्थापना; भारताच्या दिमतीला अमेरिकेतील ४० सीईओंची फौज

 


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई : करोना संकटाने भारतातील आरोग्य यंत्रणेची पुरती दमछाक झाली आहे. ऑक्सिजन, वैद्यकीय उपकरणे, व्हेंटिलेटर, बेड, औषधे या स्वरूपात इतर देशांतून मदत केली जात आहे. भारतातील करोना संकटाला थोपवण्यासाठी आता अमेरिकेतील ४० कंपन्यांच्या सीईओने पुढाकार घेतला आहे. या सीईओंनी एका टास्क फोर्सची स्थापना केली असून त्या माध्यमातून भारताला आवश्यक साधनसामुग्रीची मदत केली जाणार आहे.

नुकताच गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि भारतीय वंशाचे उद्योजक सुंदर पिचाई यांनी भारताला करोना संकट दूर करण्यासाठी १३५ कोटींची मदत केली होती. मायकोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनीदेखील मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अमेरिकेतील आघाडीच्या ४० कंपन्यांच्या प्रमुखांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. या संदर्भात सोमवारी यूएस चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल आणि यूएस इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशीप फोरमची बैठक पार पडली. लवकरच भारताला ४० हजार ऑक्सिजन मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे डेलॉइटचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुनीत रंजन यांनी सांगितले.

भारतात कशा प्रकारे मदत करता येईल यासाठी यातील निवडक उद्योजकांची टास्क फोर्ससुद्धा तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यात वैद्यकीय उपकरणे, लस, ऑक्सिजन आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा मदतीच्या स्वरूपात केला जाणार आहे. अमेरिकेतील कंपन्यांची भारतात मोठी गुंतवणूक आहे. विशेषत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी भारत मोठी बाजारपेठ आहे. भारताने करोनाच्या पहिलया लाटेचा यशस्वीपणे सामना केला होता. त्यामुळे अमेरिकेतील उद्योजक आश्वस्त झाले होते. उद्योजक भारताबाबत चिंतेत आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी आम्हा उद्योजकांवर आता जबाबदारी आहे, असे रंजन यांनी सांगितले.


सध्या भारताला ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सची प्रचंड गरज आहे. येत्या काही आठवड्यात २० हजार ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स भारताला पुरवले जातील. तसेच एक हजार ऑक्सिजन मशीन या आठवड्यात भारतात पोहोचतील, असे त्यांनी सांगितले. त्याशिवाय भारतातील काही शहरांत रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे भारतासाठी १० लीटर आणि ४५ लीटर क्षमतेचे ऑक्सिजन सिलिंडर पुरवण्याबाबत टास्क फोर्सने चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात करोना संकट निवारणासाठी झालेल्या चर्चेवर रंजन यांनी समाधान व्यक्त केले आहे. दोन्ही देशाचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे करोना संकटाशी सामना करण्यासाठी दोन्ही देशांनी एकमेकांचे सहाय्य करायला हवे असे त्यांनी सांगितले.

 

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या