Ticker

6/Breaking/ticker-posts

एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा ..; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर

 


लोकनेता न्यूज

  ( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

मुंबई: लॉकडाउन नको तर करोना रोखण्याचा पर्याय सुचवा, असं म्हणत विरोधक, तज्ज्ञ व उद्योजकांना आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ' विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष काय करताय, याचे प्रबोधनात्मक विवेचन करोना थांबविण्यात अधिक मदत करेल,' असा टोला फडणवीस यांनी हाणला आहे.

राज्यात करोना रुग्णवाढीचा आकडा दिवसाला ४५ हजारांच्याही पुढं गेला आहे. त्यामुळं लॉकडाउन लावण्याचा विचार सरकार करत आहे. मात्र, लॉकडाउन लावण्यास राज्यातील विरोधी पक्ष भाजप, काही उद्योजकांनी विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्याला संबोधित केले. जगभरातील करोनाच्या स्थितीचा आढावा घेत लॉकडाउन का आवश्यक आहे, हे सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. लॉकडाउनच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा देणाऱ्या भाजपला त्यांनी कठोर शब्दांत सुनावलं. लॉकडाउनला विरोध करणाऱ्यांनी दोन दिवसांत मला करोना रोखण्याचा अन्य पर्याय सुचवावा, असं आव्हानही त्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या भाषणाचा फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून समाचार घेतला आहे.

उद्धव ठाकरे यांनी जगभरच्या देशांतील परिस्थितीचे वर्णन केले होते. त्यांच्या या मुद्द्याचा प्रतिवाद फडणवीस यांनी जगभरातील देशांनी केलेल्या उपाययोजनांची जंत्रीच मांडली आहे. ' फ्रान्सने तिसर्‍यांदा लॉकडाऊन लावला. पण, १२० अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले. हंगेरीत वर्क फ्रॉम होमसुरू आहे, पण युरोपियन युनियनमध्ये भांडून त्यांनी हक्काचा निधी पदरी पाडून घेतला. डेन्मार्कने एप्रिल २०२० मध्येच सर्वच घटकांना पॅकेज दिले. ग्रीसनं २,२०,००० उद्योग आणि ६ लाखांवर कर्मचार्‍यांना मदत केली. एवढंच नाही तर वेतन न मिळणार्‍यांना ८०० युरोंपर्यंत मदत दिली. बेल्जियमनं पुन्हा लॉकडाउन करताना २० बिलियन युरोचं पॅकेज जाहीर केलंय. पोर्तुगाल सरकारनं १३ बिलियन युरोचं पॅकेज मार्च २०२० मध्येच जाहीर केलंय. आयर्लंडमध्ये डिसेंबरपासून कडक निर्बंध आहेत, पण, ७.४ बिलियन युरोंचं पॅकेज ऑक्टोबरमध्येच दिलंय. फिलिपाईन्सनं ३.४ बिलियन डॉलर्सचं पॅकेज सप्टेंबरमध्यंच दिलंय. युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलंय.

त्यामुळं तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे,' असं फडणवीसांनी म्हटलंय. विरोधकांनी रस्त्यावर उतरावेच, पण लॉकडाउनच्या विरोधात नव्हे तर करोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी, करोनामुळं मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी उतरावे, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरही फडणवीस यांनी ट्वीटमध्ये उत्तर दिलंय. 'आम्ही तर गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरच आहोत. रस्त्यावर उतरून पुन्हा लोकांना समजून सांगण्याची, त्यांच्या मदतीला धावून जाण्याची आमची तयारी आहे,' असं फडणवीसांनी म्हटलंय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या